प्रेमात पडलेल्या व्यक्तीला जगाची पर्वा नसते असं म्हणतात. त्यांना स्वत:च्या भल्याचा विचार सुचत नाही. आपल्या प्रेमाला विरोध करणारा प्रत्येकजण त्यांना सलू लागतो. प्रसंगी अगदी आपल्या जन्मदात्याचाही जीव घ्यायला ते मागं पुढं पाहात नाहीत. लाल स्कूटरवर फिरणाऱ्या या तरुण जोडप्याला पाहताच पोलिसांनाही असाच धक्का बसला. कारण ज्या अल्पवयीन मुलीनं काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंडच्या मदतीनं वडील आणि भावाची हत्या केली होती, तीच मुलगी बॉयफ्रेंडसोबत या स्कुटरवर बसून शहराच्या बाहेर जात असल्याचं या फुटेजमध्ये स्पष्ट झालं होतं.
काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेशातील जबलपूरमधील हा धक्कादायक प्रकार आहे. या प्रकरणात उघड झालेल्या माहितीनुसार, आरोपी असलेली अल्पवयीन मुलगी दहावीत शिकत असून ती 15 वर्षांची आहे. या मुलीचं शेजारी राहणाऱ्या मुकूल या 22 वर्षांच्या मुलावर प्रेम आहे. हे दोघंही गेल्या काही महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मुलीच्या वडिलांना हे नातं मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी तिला अनेकदा समजवलं, पण तरीही ती ऐकत नव्हती. त्यामुळे अखेर वडिलांनी मुकूलच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे मुकूलला दीड महिना तुरुंगात राहावं लागलं.
मुकूल जामीनावर सुटल्यानंतरही दोघांच्या भेटीगाठी सुरु होत्या. अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून आरोपी मुलीच्या वडिलांनी हा परिसर सोडण्याचं ठरवलं. तसंच त्यांनी नोकरीतून बदली घेण्याचाही निर्णय घेतला होता. या दरम्यान मुलीनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं वडिलांच्या हत्येचा कट रचला. तिनं वडिलांसह आपल्या 9 वर्षांच्या भावाचीही हत्या केली. त्यानंतर हे दोघं जण जवळपास 6 तास मृतदेहाजवळ बसून होते. मुलीनं भावाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह फ्रिजमध्ये लपवला. तर, वडिलांचा मृतदेह पॉलिथीन बॅगमध्ये पॅक केला.
कसा झाला उलगडा?
मुलीनं बॉयफ्रेंडच्या मदतीनं दोघांची हत्या केल्यानंतर तिच्या चुलत बहिणीला एक Voice Message केला. 'मुस्कान मी, बाबा आणि भावाला मारुन टाकलंय. तू लवकर जबलपूरला ये.' हा निरोप तिनं या मेसेजमध्ये दिला. याच मेसेजमुळे या हत्याकांडातील आरोपींचा तपास करण्यात पोलिसांना यश मिळालं. सुरुवातीला फक्त मुकूलनंच ही हत्या केल्याचा पोलिसांचा संशय होता. पण अल्पवयीन मुलगी देखील मुकूलसोबत स्कुटरवर फिरत असल्याचं CCTV फुटेजमधून स्पष्ट झालं. सध्या हे दोघंही फरार असून त्यांना अटक केल्यानंतरच या प्रकरणातील सर्व प्रश्नांची उत्तरं स्पष्ट होणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world