
गेल्या काही दिवसात ऑनलाइन फ्रॉडच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहेत. मुंबईतील व्यावसायिकासोबत असाच प्रकार घडला. आता तर हे गुन्हेगार डेटिंग अॅपचा (Dating App) वापर करीत लोकांची फसवणूक करीत असल्याचं समोर येत आहे. डेटिंग अॅपवर सुंदर मुलींच्या आग्रहाला बळी पडलेल्या एका व्यावसायिकाला तब्बल अडीच कोटींचं नुकसान सहन करावं लागलं आहे. (Online Fraud)
मिळालेल्या माहितीनुसार, भायखळ्यात मिठाई विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यावसायिकाने टिंडर अॅप डाऊनलोड केलं होतं. याच्या माध्यमातून त्यांची 15 ते 17 मार्चदरम्यान कार्मेन अनिता नावाच्या महिलेसोबत ओळख झाली. त्यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संवाद सुरू केला. यानंतर अनिता त्याला क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रेमाचा आग्रह करू लागली. तिने त्याला संकेतस्थळाचा दुवा शेअर करून ट्रेडिंग करण्यास सांगितलं. त्यानुसार व्यावसायिकाने सुरुवातील 17 लाखांची गुंतवणूक केली. पैसे खात्यावर जमा झाल्याचं लक्षात आल्याने त्याचा महिलेवर विश्वास बसला आणि त्याने तिच्याच आग्रहाखातर एक कोटींहून अधिक पैसे गुंतवले. यादरम्यान दुसऱ्या एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून त्या व्यावसायिकाची आणि शरिका सिंग नावाच्या एका महिलेसोबत ओळख झाली.तिनेही त्याला क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितलं. तिच्याही आग्रहाला बळी पडलेल्या व्यावसायिकाने तिथेही पैसे गुंतवले...
नक्की वाचा - Drink and Drive : आधी संभाजीनगर अन् आता धुळे, मद्यधुंद चालकामुळे 5 जणांचा बळी!
अनिता अन् शरिकाच्या आग्रहाने घात केला...
व्यावसायिकाने अनिताच्या आग्रहावरुन एक कोटी 29 लाख आणि शरिकाच्या आग्रहावरुन एक कोटी 13 लाखांची गुंतवणूक केली. या दोघींनीही त्याला अधिक पैशांचं आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले. गुंतवणुकीनंतर त्याने पैसे काढण्याचा प्रयत्न केला, पण ते मिळाले नाही. यानंतर आपल्यासोबत फ्रॉड झाल्याचं त्याच्या लक्षात आले. यानंतर व्यावसायिकाने पोलिसात धाव घेतली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world