मुंबई सत्र न्यायालयाने बलात्काराचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला अटकपूर्व जामीन देत दिलासा दिला आहे. बलात्काराचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. आरोपीचे वय 46 वर्षे असून त्याच्या आधीच्या प्रेयसीचे वय 30 वर्षे आहे. हे दोघे जण लिव्ह इनमध्ये राहात होते. या दोघांमधील शारिरीक संबंध हे सहमतीने झाले होते, मात्र दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्याने हा प्रकार बलात्काराची तक्रार नोंदवण्यापर्यंत गेला असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीने आपल्या बचावासाठी सहमतीपत्र म्हणजेच MOU सादर केला होता. लिव्ह इनमध्ये राहाण्यापूर्वी आरोपीने त्याच्या प्रेयसीसोबत हा सहमती करार केला होता. ऑगस्ट 2024 ते जून 2025 या काळासाठी हा सहमती करार करण्यात आला होता. न्यायालयाने या सहमती करारापत्राबाबत बोलताना म्हटले की याच्या सत्यतेबाबत सध्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत आम्ही पोहोचलेलो नाहीये.
मुंबई सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश शनाया पाटील यांच्यासमोर सदर प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायाधीशांनी म्हटले की "पीडितेचे म्हणणे आहे की या सहमती करारपत्रावरील सही तिची नाहीये. आमच्यासमोर मांडण्यात आलेली कागदपत्रे ही नोटरीचा स्टँप असलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी आहेत. असं असलं तरी आरोपीने पीडितेसोबतचे त्याचे संबंध नेमके कसे होते हे दाखवण्यासाठी ही कागदपत्रे सादर केली आहेत. "
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीला चौकशीला सामोरे जावे लागेल असेही न्यायालयाने म्हटले. पीडितेने तिचे अश्लील व्हिडीओ काढल्याचा आरोप केला आहे, या आरोपाला अद्याप बळकटी मिळालेली नाही. त्यामुळे या दृष्टीने तपासासाठी आरोपीने पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य करणे गरजेचे आहे असे न्यायालयाने म्हटले. मात्र ज्या पद्धतीने या प्रकरणी आरोप करण्यात आलेले आहेत ते पाहाता आरोपीला अटकेपासून संरक्षण मिळणे गरजेचे असल्याचेही न्यायालयाने म्हटले.
सदर प्रकरणातील पीडिता ही घटस्फोटीत आहेत. तिची आणि आरोपीची 6 ऑक्टोबर 2023 ला ओळख झाली होती. आरोपीने काही काळानंतर तिला लग्नाची गळ घातली होती. पीडितेने आरोपीसोबत शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. मात्र लग्नाचे वचन दिल्यानंतर तिने संबंधांना होकार दिला. पीडितेने आरोप केला आहे की आरोपीचे अन्य एका महिलेसोबत संबंध होते. त्यानंतर आरोपीने आपल्यावर बलात्कार केला असे पीडितेचे म्हणणे आहे. यामुळे मी गर्भवती राहिले होते आणि आरोपीने मला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याचाही आरोप पीडितेने केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world