अमजद खान, प्रतिनिधी
मुंबईतील मालाड परिसरात राहणारा तरुण कामानिमित्तानं कल्याणमध्ये आला होता. त्यावेळी त्याचा रस्त्यावरील बॅरिकेटींगच्या ठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांशी वाद झाला. या वादामध्ये त्याचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
कल्याणमध्ये स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सुरु असलेल्या पूलाच्या कामासाठी रस्त्यावर बॅरिकेटिंग करण्यात आली होती. दरम्यान एका तरुणाला खाजगी सुरक्षा रक्षकाने त्या दिशेने जाण्यासाठी मज्जाव केला. यावरुन सुरक्षा रक्षक आणि तरुणामध्ये वाद झाला. या वादात सुरक्षा रक्षकाने राजकुमार यादव या नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत राजकुमारचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने पसार झालेल्या तिघा सुरक्षा रक्षकांना अटक केली आहे. राहूल शिंदे, सचिन शिंदे आणि विजय ढांगे अशी त्या तीन आरोपींची नावे आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
कल्याण पश्चिमेतील स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत स्टेशन परिसर विकासाचे काम सुरु आहे. यामध्ये स्टेशनला लागूनच उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. रात्री 11 ते पहाटे पाच वाजताच्या दरम्यान हे काम सुरु असते. काम सुरु असताना पूलाखाली रस्त्यावर काही ठिकाणी बॅरिकेटिंग केली आहे. पूलाच्या कामा दरम्यान कोणी जखमी हाेऊ नये यासाठी बॅरिकेटिंग केलेल्या परिसरात लोकांना जाण्याकरीता मज्जाव केला जातो.
सोमवारी मध्यरात्री पूलाचे काम सुरु होते. या दरम्यान हा तरुण बॅरीकेटिंगच्या दिशेने आला. त्याला त्याठिकाणी असलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकाने त्याला त्याठिकाणी जाण्यासाठी मज्जाव केला. यावरुन राजकुमार यादव आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतरण हाणामारीत झाले. या दरम्यान राजकुमार खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो बेशुद्ध पडला. हे पाहून मारहाण करणारे सुरक्षा रक्षक पळून गेले.
( नक्की वाचा : मायणी मेडिकल कॉलेज प्रकरण, दीपक देशमुखांना कोर्टाचा दिलासा )
राजकुमार यादव हा मूळचा बंगाल असून तो सध्या मालाड येथे राहत होता. काही कामानिमित्त तो कल्याणला आला होता. तेव्ही ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिस त्याठिकाणी दाखल झाले. घटना घडली त्याठिकाणचा सीसीटव्ही फुटेज एका मेडिकल दुकानातून हस्तगत केले. या सीसीटीव्हीच्या फूटेजमध्ये तीन सुरक्षा रक्षक राजकुमारला मारहाण करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला. अखेर पोलिसांनी या तिघांना तीन तासाच्या आत ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world