Nagpur News : नागपुरात एका २३ वर्षी तरुणीने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. मात्र पोलीस तपासात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपुर शहराच्या गोधनीत भरदिवसा तरुणीच्या आत्महत्येचं गूढ उकललं असून ही निर्घृण हत्या एकतर्फी प्रेमातून झाली आहे. शेजारच्या माणसाने घरात घुसून तरुणीची हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे.
आत्महत्या नव्हे हत्याच...
नागपुरच्या गोधनीत भागात 23 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात होतं. मात्र ही आत्महत्या नसून डोक्याला गंभीर दुखापतीमुळे तिची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. प्राथमिक शव विच्छेदन अहवालात हा खुलासा झाला. या प्रकरणात जीवे ठार मारणाऱ्या अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर शहरातील मानकापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलेक्टर कॉलनी गोधनी येथे राहणारी 23 वर्षीय प्राची हेमराज खापेकरही तरुणी तिच्या राहत्या घरात बेडरूममध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. बुधवार, 21 जानेवारी रोजी ही घटना घडली होती. प्राची बी.ए.ची विद्यार्थिनी होती. शिवाय शेअर ट्रेडिंगचे प्रशिक्षण घेत होती.
तिच्या आईने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. सर्वांना ही आत्महत्या असावी असंच वाटत होतं. मात्र, प्राथमिक शवविच्छेदन अहवालात, प्राचीचा मृत्यू डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं समोर आलं. कोणी अज्ञात इसमाने शस्त्राने तिच्या डोक्यावर वार केले आणि तिला जिवानिशी ठार मारले. त्यानंतर ही आत्महत्या असल्याचा भास निर्माण करण्यासाठी पुरावे नष्ट केले. या संदर्भात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून अज्ञात मारेकऱ्याविषयी पुढील तपास सुरू केला आणि तपासात महत्त्वाच्या बाबी पुढे येत गेल्या आणि संशयाची सुई शेजारी राहणाऱ्या शेखरकडे गेली.
कोण आहे शेखर?
आरोपी शेखर अजाबराव ढोरे हा 38 वर्षांचा आहे. तो प्राचीच्या शेजारी राहत होता. त्याचं प्राचीवर प्रेम होतं. मात्र हे प्रेम एकतर्फी होतं. प्राचीला शेखरसोबत भावनिक गुंतवणूक नव्हती. तिने आधीच त्याच्या प्रेमाला नकार दिला होता. प्राचीने दिलेला नकार पचवू न शकल्याने शेखरने तिचा खून केला. प्राचीचं कुटुंब बाहेर गेले असताना शेखर घरात घुसला. प्राचीचे आई-वडील आणि भाऊ कामावर गेले होते. त्यामुळे घरात प्राची एकटी होती. शेखरने तिचा रागाच्या भरात गळा दाबला आणि तिचं डोके आपटून हत्या केली. मात्र त्यानंतर आत्महत्येचा बनाव रचण्यासाठी तिला ओढणीने फाशी लावली. डोक्याला गंभीर मार, शरीरावर जखमांच्या खुणा असल्यानं पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून शेखर याला अटक करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
