
प्रांजल कुलकर्णी
नाशिकच्या नामांकित नामको कॅन्सर रूग्णालयातील एका प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सर्वसामान्यांना स्वस्त दरात उपचार घेता यावेत यासाठी धर्मादाय रुग्णालयांची उभारणी करण्यात आली आहे. येथे रुग्णांना स्वस्त दरात उपचार मिळणं अपेक्षित असताना नाशिकमधील याच धर्मादाय रुग्णालयात रुग्णाकडून लाच स्वीकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लाच स्वीकारल्याप्रकरणी नामको या धर्मादाय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांसह तिघांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे पिवळे रेशन कार्डधारक असून त्यांच्या पत्नीची नामको कॅन्सर हॉस्पिटलला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत किडनी संबंधित आजारावर शस्त्रक्रिया झाली होती. दरम्यान या शस्त्रक्रियेचे सर्व पैसे आम्हाला शासनाकडून आले नसून उर्वरित पैसे तुम्हाला द्यावे लागतील असं कारण देत तक्रारदाराकडून 3 एप्रिल 2025 ला 30 हजारांची मागणी करून 9 हजार रुपये स्वीकारण्यात आले. त्यानंतर 07 एप्रिलला 2025 ला पुन्हा 21 हजार रुपयाची मागणी करून तडजोडीअंती 11 हजार रुपये घेण्यात आले होते.
नक्की वाचा - Nagpur News : प्रेयसीच्या जळत्या सरणावर तरुणाची उडी; उपस्थितांनी धू धू धुतला
दरम्यान याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास करत रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक विशाखा जहागिरदार, महिला कर्मचारी गायत्री सोमवंशी आणि आणखी एका महिला कर्मचाऱ्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7, 7अ, 12 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा गरिबांना लाभ मिळावा हा खरा उद्देश आहे मात्र या योजनेच्या आडूनच अशाप्रकारे रुग्णालयाकडून गरिबांची लूट केली जात असेल तर हा प्रकार निश्चितच गंभीर आहे..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world