मुंबई: तळोजा परिसरातील एका गावात शुक्रवारी दुपारी नमाज अदा करून घरी परतणाऱ्या मुस्लिम कुटुंबांवर काही लोकांनी धारदार शस्त्रांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात किमान 12 जण जखमी झाले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
प्राथमिक माहितीनुसार, स्थानिक स्तरावरील वैयक्तिक वादामुळे हा हल्ला झाल्याचे समजते. हल्लेखोरांकडे धारदार शस्त्रं होती आणि त्यांनी मुस्लिम बांधवांवर थेट वार केले. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असले तरी, अद्यापपर्यंत कोणताही अधिकृत गुन्हा तळोजा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आलेला नाही. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, पोलिसांकडून आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यामुळे पीडित कुटुंबांना न्याय मिळण्यात अडथळे येत आहेत.
पीडितांकडून वारंवार तक्रारी करूनही पोलिसांनी गंभीरपणे दखल घेतलेली नाही. उलट गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे पोलिसांवर रोष व्यक्त केला जात आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे आता या प्रकरणाची जबाबदारी आहे. गुन्हा नोंद न केल्यास आणि आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास, जनतेच्या सुरक्षेबाबत पोलिसांवरील विश्वास डळमळीत होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि मुस्लिम संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या हिंसक घटनेनंतर तळोजा परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून, पोलिसांकडून निष्पक्ष कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
( नक्की वाचा : Pune Rave Party : 'माल पाहिजे का'? पोलिसांच्या तपासात खडसेंच्या जावयाबाबत अनेक धक्कादायक गोष्टी उघड )