नवी मुंबई: नवी मुंबई कोपरखैरणे परिसरात राहणाऱ्या 34 वर्षीय परिचारिकेची बुधवारी दुपारी घरात निर्घृण हत्या करण्यात आली असून, त्यानंतर पतीनेही अंगावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कोपरखैरणे पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, “आज, 11 जून रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” हत्या झालेली महिला गौरी गणेश शिरसाट (वय ३४) अशी असून त्या पेशाने नर्स होत्या. त्यांचे पती गणेश मारुती शिरसाट (वय ३८) सध्या बेरोजगार आहेत आणि त्यांच्यावरच हत्या केल्याचा संशय आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की, “बुधवारी दुपारी12.30 च्या आधी ही घटना घडली. शेजाऱ्यांनी घरात काहीतरी गडबड असल्याचा संशय व्यक्त केला आणि पोलिसांना माहिती दिली. आमची टीम घटनास्थळी दाखल झाली असता, गौरी शिरसाट यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या अंगावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले. हत्या का केली गेली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. "गौरी यांची हत्या का झाली याचा तपास सुरू असून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत," असे पोलिसांनी स्पष्ट केले.
(नक्की वाचा: Raja Raghuvanshi Murder Case : राजाशी लग्न ठरवलं, सोनमने आईला धमकी दिली; तेव्हाच सांगितला होता प्लॅन)
आरोपी पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
“घटनास्थळी पोहोचल्यावर आम्हाला आरोपी गणेश शिरसाट हेही जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांनी स्वतःच्याच हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत,” अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गौरी शिरसाट यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, जेणेकरून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, कारण आरोपी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र आम्ही सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहोत,” असे पोलिसांनी सांगितले. या हत्याकांडामुळे कोपरखैरणे परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव की इतर काही कारण याचा तपास पुढील चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.
( नक्की वाचा : Raja Raghuvanshi : 'माझी बहीण गुन्हेगार' राजाच्या आईचे पाय धरत सोनमच्या भावाचा मोठा निर्धार )