Navi Mumbai : विमा पॉलिसीची थकीत रक्कम परत मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका नागरिकाची तब्बल 61 लाख 45 हजार 580 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला नवी मुंबई सायबर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईत असल्याची माहिती समोर आली असून त्याच्या अटकेसाठी लूकआऊट सर्क्युलर (LOC) जारी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक 19/2026 नुसार, अज्ञात व्यक्तींनी फिर्यादीशी विविध मोबाइल क्रमांकांद्वारे संपर्क साधला. फिर्यादीच्या नावावर विमा पॉलिसीची मोठी रक्कम प्रलंबित असल्याचे सांगून ती मिळवून देण्यासाठी विविध शुल्क, कर आणि प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यास भाग पाडले. विश्वासार्ह कागदपत्रे ऑनलाइन पाठवून आरोपींनी फिर्यादीची दिशाभूल केली आणि लाखो रुपयांची फसवणूक केली.
आरोपी पॉलिसीधारकांपर्यंत कसा पोहोचला?
सायबर पोलिसांच्या तांत्रिक तपासादरम्यान या प्रकरणातील आरोपी शाहरुख मेहताब खान (वय 30) याचा सहभाग उघड झाला. तो दिल्लीतील मंजुपूर परिसरातील रहिवासी असून त्याला जाफराबाद, दिल्ली येथून अटक करण्यात आली. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, आरोपी एका पॉलिसी कार्यालयात काम करत होता. तेथून तो पॉलिसीधारकांची गोपनीय माहिती मिळवत असे. त्यानंतर पॉलिसीधारकांशी संपर्क साधून त्यांच्या नावावर मोठी रक्कम अडकली असल्याचे भासवत असे. फसवणुकीची रक्कम जमा करण्यासाठी विविध बँक खाती उपलब्ध करून देत पैसे स्वीकारले जात होते. जमा झालेल्या रकमेचा आरोपी आणि त्याचे साथीदार गैरलाभ घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार समीर हा दुबईत असल्याची माहिती मिळाली असून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याला भारतात परतल्यानंतर अटक करण्यासाठी सायबर पोलीस प्रयत्नशील आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भोईर, राहुल कोळी, विजय आयरे, सचिन शिंगोटे, फटांगरे आणि गडगे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
डिजिटल फसवणुकीपासून कसे वाचाल?
नवी मुंबई सायबर पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. कोणत्याही विमा पॉलिसीची थकीत रक्कम मिळणार असल्याचा फोन आल्यास संबंधित कंपनीच्या अधिकृत कार्यालयाशी थेट संपर्क साधा. फोन, व्हॉट्सअॅप किंवा ई-मेलद्वारे मिळालेल्या कागदपत्रांवर आंधळा विश्वास ठेवू नका. पॉलिसी परतावा, बोनस किंवा मॅच्युरिटी रक्कम मिळवून देण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागते, असे सांगितल्यास सावध राहा. अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून कोणत्याही बँक खात्यात पैसे जमा करू नका. वैयक्तिक माहिती, आधार क्रमांक, पॅन कार्ड, बँक तपशील किंवा ओटीपी कोणालाही देऊ नका. संशयास्पद कॉल किंवा संदेश मिळाल्यास तत्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर संपर्क साधा किंवा सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा. सायबर गुन्हेगार नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांबाबतची माहिती मिळवून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने फसवणूक करीत असल्याने प्रत्येकाने डिजिटल व्यवहार करताना सतर्क राहण्याची गरज असल्याचे नवी मुंबई सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world