
Navi Mumbai Crime : नवी मुंबईत कामगारांवर मालकाची दादागिरीची घटना समोर आली आहे. वाशी येथील एका मिठाई दुकानातील दोन कामगारांना त्यांच्या मालकाने मध्यरात्री राहत्या खोलीत जाऊन बेदम मारहाण केली. त्यांच्याकडून मोबाइल हिसकावून घेतला आणि पोलिसांत तक्रार दिल्यास “काटके फेक दूंगा” अशी धमकी दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही घटना आहे वाशी सेक्टर 29 येथील ‘द्वारका स्वीट्स' या दुकानातील. राहुलकुमार हिरालाल आणि रामनरेश हे दोघे कामगार दुकानात चाट काऊंटरवर काम करतात. 15 एप्रिल रोजी कामावरून परतल्यानंतर ते खोलीत बसून विश्रांती घेत असताना फॅन सुरू करण्याच्या कारणावरून एका सहकाऱ्याशी वाद झाला. या वादाची माहिती संबंधित सहकाऱ्याने थेट मालक प्रकाश सीरवी यांना दिली.
नक्की वाचा - अल्पवयीन मुलगी गर्भवती, नांदेडमध्ये प्रसुती, नवजात अर्भकालाही...; 55 वर्षीय उपसरपंचाच्या गुन्ह्यांची परिसीमा
त्यानंतर मालक स्वतः रात्री 12.30 च्या सुमारास त्यांच्या राहत्या खोलीत पोहोचले आणि त्यांनी राहुलकुमार यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. दोघांमध्ये पडलेल्या रामनरेश यालाही मारहाण झाली. इतकंच नव्हे तर राहुलकुमार यांचा 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल देखील जबरदस्तीने हिसकावून घेतला गेला. या मारहाणीनंतर दोघांनाही कामावरून काढून टाकण्यात आलं आणि 15 दिवसांचा पगार देखील देण्यात आलेला नाही. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पोलिसांत तक्रार केल्यास “काटके फेक दूंगा” अशी उघड धमकी दिल्याचं तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे. कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world