जाहिरात

Shirdi Crime : शिर्डीत 150 रुपयांसाठी मृत्यू, पीडित झोपेत असताना कानाखाली मारली; जागीच ठार

शिर्डीतील नगर-मनमाड महामार्गावरील खंडोबा कॉम्प्लेक्स समोर मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात केवळ 150 रुपयांच्या कारणावरून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Shirdi Crime : शिर्डीत 150 रुपयांसाठी मृत्यू, पीडित झोपेत असताना कानाखाली मारली; जागीच ठार

सुनिल दवंगे शिर्डी 

शिर्डीतील नगर-मनमाड महामार्गावरील खंडोबा कॉम्प्लेक्स समोर मध्यरात्री घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात केवळ 150 रुपयांच्या कारणावरून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, ती व्यक्ती कॉम्प्लेक्सच्या एका कोपऱ्यात झोपली असताना तिघा जणांनी त्याच्याकडील पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या झटापटीत एका आरोपीने त्याच्या कानशिलात जोरात मारली आणि त्या धक्क्याने पीडित जमिनीवर कोसळून जागीच मरण पावला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नेमकं काय घडलं?

मृत व्यक्ती खंडोबा कॉम्प्लेक्सच्या बंद असलेल्या दुकानांसमोर झोपलेली होती. त्याचवेळी तिघेजण तिथे आले आणि त्याच्या खिशात हात घालून पैसे चोरण्याचा प्रयत्न करू लागले. झोपेतून जागे झाल्यावर पीडित व्यक्तीने त्यांना विरोध केला. यामुळे त्यांच्यात झटापट सुरू झाली. यावेळी एका आरोपीने  जोरदार कानशिलात लगावली. त्यामुळे तो जमिनीवर पडून बेशुद्ध झाला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाल्याच समोर आलं आहे.

हा सर्व प्रकार मध्यरात्री घडला असून रात्री राऊंडवर असलेल्या पोलीस पथकाला संबोधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जमिनीवर पडलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

Dhule Crime : सब गडबड है! कोट्यवधींचा उद्योग, मात्र प्रत्यक्षात केवळ पत्र्यांचा शेड; 31 जणांकडून 11 कोटी 68 लाखांचा अपहार

नक्की वाचा - Dhule Crime : सब गडबड है! कोट्यवधींचा उद्योग, मात्र प्रत्यक्षात केवळ पत्र्यांचा शेड; 31 जणांकडून 11 कोटी 68 लाखांचा अपहार

आरोपी कोण?

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर याभागातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीनही आरोपींची ओळख पटवण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत एकजण सिन्नर (नाशिक) येथील दुसरा हिंगोली जिल्ह्यातील आणि तिसरा कोल्हार, नगर जिल्हा येथील असल्याच पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

मृत व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट नाही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. तो भीक मागणारा असावा किंवा स्थलांतरित मजूर असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

या प्रकरणात शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या BNS 105 कलमान्वये ‘सदोष मनुष्यवधाचा' गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिर्डी पोलीस अधिक तपास करत असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्यावर भर दिला जात आहे. यासोबतच आरोपींचा मागील गुन्हेगारी इतिहास देखील तपासला जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com