नागिंद मोरे, प्रतिनिधी
Dhule News : आज देशभरात शिवजयंती उत्साहाने साजरी केली जात आहे. निश्चयाचा महामेरु.. बहुत जनांसी आधारु... अखंड स्थितीचा निर्धारू... श्रीमंत योगी, शत्रुपक्षाच्या स्त्रियांनाही मातेसमान वागणूक देणाऱ्या महाराजांच्या जन्मदिनी धुळ्यातून संतापजनक प्रकार समोर आला आहे.
चिमुरडीने खुणेनं सांगितला धक्कादायक प्रकार...
शिरपूर शहरात माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. येथील अवघ्या तीन वर्षांपेक्षा लहान चिमुकलीवर एका नराधमाने अनैतिक कृत्य केल्याचं उघड झालं आहे. हा २९ वर्षांचा नराधम एसटी विभागात कर्मचारी आहे. सोनू पाटील उर्फ कुणाल श्रीधर देसाई (वय 29) याने अवघे २ वर्ष नऊ महिने वयाच्या चिमुकलीवर अनैसर्गिक अत्याचार केले. सोनू पाटील हा अविवाहित असून, चिमुकली त्याच्या घरी खेळायला जात असे. चिमुकलीला अचानक त्रास होऊ लागला. तिला ताप, उलट्या आणि पोट दुखू लागले. तिच्यासोबत नेमकं काय घडलं ते तिला सांगताही येत नव्हता. चिमुकलीने सोनू पाटीलकडे बघून पालकांना इशाऱ्याने वाईट कृत्याविषयी सांगितलं. पालकांनी तत्काळ चिमुकलीला स्त्रीरोग तज्ज्ञांकडे दाखल केले. चिमुरडीची चाचणी केल्यानंतर हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला. चिमुरडीला धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.
पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर सोनू पाटील यांच्या विरोधात शिरपूर शहर पोलिसात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरपूर शहर पोलिसांनी सोनू पाटील यास अमळनेर येथून ताब्यात घेतलं आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world