सूरज कसबे, प्रतिनिधी
Cyber Crime Latest News : अमेरिकन आर्मी आणि म्यानमार पोलिसांनी संयुक्त कारवाई करून म्यानमारमधील सायबर फ्रॉड रॅकेटमधून हजारो भारतीयांची सुटका केली होती. भारतीय दूतावासामार्फत या नागरिकांना सुरक्षित भारतात पाठवण्यात आले होते. मात्र, त्यापैकीच तीन जणांनी भारतात परतल्यानंतर पुन्हा सायबर गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. सुशील भगवान जुवाटकर, पंकज राज कपूर आणि निश्चल टंगबीर बरेयलीन, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींकडून 6 मोबाईल, 3 पासपोर्ट, 2 लॅपटॉप, 2 हार्ड डिस्क, क्यूआर कोड, 24 बँक अकाउंट ओपनिंग किट आणि 5 डेबिट कार्ड जप्त करण्यात आले आहेत. दोन कोटी रुपयांच्या एका मोठ्या सायबर फसवणूक प्रकरणाचा तपास करत असताना, पोलिसांना सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एका खात्यात 1 लाख 25 हजार रुपये ट्रान्सफर झाल्याचा तांत्रिक तपशील मिळाला.
नक्की वाचा >> Pune News : पुणे-सुपौल धावत्या एक्स्प्रेसमध्ये गर्भवती महिलेला अचानक प्रसूती वेदना, पुढे असं काही घडलं..
पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आणि..
हे खाते आरशील इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नवी मुंबईत उघडण्यात आले होते. या माहितीच्या आधारे पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आणि त्यांनी सुशील जुवाटकरला नवी मुंबईतून ताब्यात घेतले. सुशीलची सखोल चौकशी केली असता, त्याने उघडलेल्या बँक खात्यांचा वापर त्याचे साथीदार पंकज राज कपूर आणि निश्चल बरेयली करत असल्याची कबुली दिली. तपासात असे निष्पन्न झाले की, या आरोपींनी यापूर्वी बँकॉक आणि म्यानमारमध्ये जाऊन सायबर फसवणुकीचे गुन्हे केले होते.
नक्की वाचा >> Pune News : पुणे जिल्ह्यातल्या 'या' भागात पाण्यासाठी रणकंदन, 27 वर्षे जुन्या पाणीपुरवठा योजनेविरोधात 'हंडा मोर्चा'
म्यानमारमधील कॉल सेंटरमध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्या या टोळीचा नवी मुंबईत स्वतःचे नवीन कॉल सेंटर सुरू करून सायबर फ्रॉडचे मोठे जाळे विणण्याचा कट होता. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलीस करत असून यामध्ये आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.