जाहिरात

Puja Khedkar Bail Rejected : पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन नाकारला, कोणत्याही क्षणी अटक होणार

पूजाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. 

Puja Khedkar Bail Rejected : पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन नाकारला, कोणत्याही क्षणी अटक होणार
नवी दिल्ली:

रामराजे शिंदे

युपीएससीने उमेदवारी रद्द केल्यानंतर ूजा खेडकर हिला आज आणखी एक दणका बसला आहे. दिल्लीतील पटियाला कोर्टाने पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. यामुळे पूजाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पूजाने अटक टाळण्यासाठी धावाधाव करण्यास सुरुवात केली असून तिने दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )  

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाची सुनावणी बुधवारी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात झाली होती. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. हा निकाल आज जाहीर करण्यात आला. पूजा यांच्या वकीलांनी त्यांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जोरदार युक्तिवाद केला. पूजा हिने कोणतीही फसवणूक केलेली नाही, पूजाचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र अयोग्य कसे ठरते? पूजा महिला असल्याने तिला त्रास दिला जात असल्याचे पूजाच्या वकिलांनी म्हटले होते. सरकारी वकिलांनी सदर प्रकरणात बऱ्याच बाबींची चौकशी होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. पूजाने किती वेळा नाव बदलून परीक्षा दिल्या यासह अनेक बाबींची चौकशी होण्याची गरज असल्याचे सरकारी वकिलांनी तसेच युपीएससीच्या वकिलांनी म्हटले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्तींनी सदर प्रकरणाचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात येईल असे सांगितले होते. 

युपीएससीने बुधवारी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर हिच्याविरोधात कारवाई केली होती. नागरी सेवा परीक्षा 2022 चे उल्लंघन केल्याप्रकरणी पूजाची उमेदवारी तात्पुरती रद्द करण्यात आली. पूजा हिला भविष्यात युपीएससीची परीक्षा देण्यावर बंदी घालण्यात आली असून निवडीवरही बंदी घालण्यात आली आहे. युपीएससीने जाहीर केलेल्या माहितीनुसार पूजा मनोरमा दिलीप खेडकर हिने ओळख लपवून युपीएससीची परीक्षा दिली. परीक्षेसाठी असलेल्या प्रयत्नांची मर्यादा पूजाने विविध पळवाटा काढून बेकायदेशीररित्या ओलांडल्याचेही युपीएससीने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात युपीएससीने पूजा खेडकर हिला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. 25 जुलै पर्यंत आपले म्हणणे मांडण्यास पूजाला सांगण्यात आले होते मात्र पूजाने 4 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून मागितली होती. पूजाची मागणी अमान्य केली मात्र उत्तर सादर करण्याची मुदत 25 ऐवजी 30 जुलै करण्यात आली होती. उत्तर सादर करण्यासाठीची ही शेवटची संधी असल्याचेही म्हटले होते. मुदतीत प्रतिसाद न दिल्यास कारवाई करण्यात येईल असे पूजाला स्पष्टपणे सांगण्यात आले होते. 

पूजाने कोणतेही चुकीचे काम केले नसल्याचा वकिलांचा युक्तिवाद

पूजा खेडकरांची बाजू अ‍ॅड. माधवन यांनी मांडली. त्यांनी म्हटले की, पूजाविरोधात जी कलमे लावली आहे त्यानुसार त्यांना अटक होण्याचा धोका आहे. पूजाने कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. तिच्यावर नाव बदलण्याचा आरोप आहे. मात्र तिने नाव बदलल्याचे गॅझेट काढले आहे. खोटे अपंगत्व प्रमाणपत्र घेतल्याच्या आरोपावर युक्तिवाद करताना पूजाच्या वकिलांनी म्हटले की, पूजा यांना दिलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र हे एका डॉक्टराने दिलेले नाही तर आठ डॉक्टरांनी दिले आहे. हे प्रमाणपत्र एम्स बोर्डाकडून देण्यात आल्याचेही पूजाच्या वकिलांनी म्हटले आहे. या प्रमाणपत्राची मूळ प्रत युपीएससीकडे सादर करण्यात आली असल्याने ही फसवणूक कशी ठरते असा सवाल पूजाच्या वकिलांनी विचारला आहे. 

सरकारी वकीलांचे म्हणणं काय होते? 

पूजा खेडकर यांनी बनावटगिरी आणि फसवणूक केली आहे असे सरकारी वकील अ‍ॅड. श्रीवास्तव यांनी युक्तिवाद करताना म्हटले. पूजा यांनी अशी माहिती लपवली की ज्यामुळे तिला परीक्षेला बसण्यापासून वंचित केले गेले असते. पूजाने वारंवार आपली भूमिका बदलली आहे. त्यामुळेच तिची चौकशीची गरज आहे. त्यामुळे कोठडी द्यावी अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. पूजा यांना जर अटकपूर्व जामीन दिला तर ती चौकशीत सहकार्य करणार नाही असेही सरकारी वकीलांनी म्हटले. पूजा खेडकर हिला आपण बनावट कागदपत्र बनवली असून त्या आधारे युपीएससीची परीक्षा दिल्याचे माहिती गोते. पूर्ण शुद्धीत असताना त्यांनी हे कृत्य केले आहे. ⁠यूपीएससीच्या नियमावलीत हे स्पष्टपणे लिहिले आहे की, जर तुम्ही बनावट कागदपत्रे सादर केली तर तुमची उमेदवारी रद्द होईल तसेच तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. त्यामुळे गुन्हा दाखल होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण पाहाता त्यांना अटकपूर्व जामीन देवू नये.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा लैंगिक छळ, नायर रुग्णालयाच्या प्राध्यापकाचे निलंबन
Puja Khedkar Bail Rejected : पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन नाकारला, कोणत्याही क्षणी अटक होणार
Three members of the same family drowned in Savitri river in Raigad
Next Article
सावित्री नदीत एकाच कुटुंबातील तीन जण बुडाले