प्रतीक्षा पारखी, प्रतिनिधी
पुण्यात दारु पिऊन पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणानं दिलेल्या धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला. त्या तरुणानं कार चालवण्यापूर्वी रात्रभर पुण्यातल्या कोझी बारमध्ये मित्रांसोबत पार्टी केल्याचं CCTV फुटेजमधून उघड झालं होतं. त्या तरुणाच्या गोलाकार टेबलवर अनेक दारुच्या बाटल्या दिसत होत्या. अल्पवयीन तरुणाला दारु देणं पुण्यातल्या बारला भोवलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं तो बार सिल केलाय.
हॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) आणि पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वुड) मॅरियट सूट- ब्लॅक या दोन्ही हॉटेल/ परमिट रूम/पब आस्थापनांचे व्यवहार तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उत्पादन शुल्क विभागाला दिले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय.
अनीश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोन जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय. मुळचे मध्य प्रदेशमधील असलेले हे दोघं पुण्यात कामासाठी स्थायिक झाले होते. शनिवारी रात्री 2 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास हा अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे बेदरकार पद्धतीनं ही पोर्शे कार चालवणाऱ्या या तरुणाला फक्त 15 तासांमध्ये जामीन मंजूर झाला.
( नक्की वाचा : 'इंजिनीयर लेक कायमची गेली, आता...'; पुणे अपघातात जीव गमावणाऱ्या अश्विनीच्या कुटुंबाचा शोक अनावर )
या प्रकरणात पबचे मालक आणि व्यवस्थापक यांना पोलिसांनी अटक केलीय. प्रल्हाद भुतडा सचिन काटकर आणि संदीप सांगळे या तिघांना पुणे पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी या तरुणावर निष्काळजीपणे गाडी चालवणे, जीव आणि वैयक्तिक सुरक्षा धोक्यात आणल्याच्या आरोपाखाली भारतीय दंड संहिता तसंच महाराष्ट्र मोटार वाहन कायद्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
( नक्की वाचा : रात्रभर पबमध्ये दारु ढोसली आणि पोर्शे कार चालवली, पुण्यात 2 जणांना उडवणाऱ्या तरुणाचं CCTV फुटेज उघड )
पुण्यात विशेष मोहीम
पुण्यातल्या पोर्शे कार अपघातानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानं शहरात विशेष मोहीम सुरु केलीय. पुणे शहरातील सर्व पब्ससह इतर परमिट रूमची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. पुढील मुद्याच्या आधारावर त्यांची तपासणी होणार आहे.
- परवानाधारक अल्पवयीन मुलांना कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करू नये.
- परवानाधारकाने पहाटे 1.30 नंतर (दिलेली वेळ) कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करू नये.
- परवानाधारक महिला वेटर्समार्फत उत्पादन शुल्क विभागाच्या नोकरनामा शिवाय आणि रात्री 9.30 नंतर कोणतीही विदेशी दारू सर्व्ह करू शकणार नाही.
- बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट-1949 आणि बॉम्बे फॉरेन लिकर रुल्स-1953 अंतर्गत येणाऱ्या विविध तरतुदी आणि नियमांचे उल्लंघन केले असेल तर त्या आस्थापनांवर नियमानुसार गुन्हे नोंद केले जातील. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संबंधित मद्य विक्री लायसन्स निलंबित अथवा रद्द केले जातील.