देवा राखुंडे, प्रतिनिधी
Pune News: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील कापूरहोळ परिसरात आज दुपारी (मंगळवार, 3 मार्च 2026) एक अतिशय थरारक घटना घडली. एका प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या 18 वर्षीय मुलाचे भरदिवसा अपहरण करण्यात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र जेजुरी पोलीस, निरा पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने या तरुणाची अवघ्या काही वेळातच सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण असले तरी पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी दुपारी कापूरहोळ परिसरातून एका XUV कारमधून आलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी या तरुणाला गाठले आणि त्याचे अपहरण केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे उपस्थित नागरिक हादरून गेले. घटनेचे गांभीर्य ओळखून मुलाच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.
त्याचबरोबर ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातूनही मदतीसाठी आवाहन करण्यात आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आणि संपूर्ण परिसरात नाकाबंदी लागू केली.
( नक्की वाचा : पार्टी, दारू आणि रक्ताचा खेळ! अभिनेत्रीच्या आयुष्यात 'दुसरा' आला आणि 'पहिल्या'चा घात झाला; असा रचला हत्येचा कट )
पोलिसांचा पाठलाग आणि उसाच्या शेतात अडकलेली कार
अपहरणाची माहिती मिळताच जेजुरी आणि निरा पोलिसांनी जेऊर तसेच निरा परिसरात कडेकोट नाकाबंदी केली. संशयित वाहनाचा शोध घेत असताना पोलिसांना जेऊरकडून पिसुर्टीच्या दिशेने जाणारी एक संशयित कार दिसली.
पोलिसांनी या कारचा पाठलाग करून ती अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्ता अरुंद असल्याने आणि पोलिसांचा दबाव वाढल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या शेतात जाऊन अडकली.
( नक्की वाचा : Pune News: पुणे मेट्रोची नवी गुगली! आता स्टेशनमध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी बदलावी लागणार सवय )
तरुणाची सुटका पण...
कार शेतात अडकताच पोलीस जवळ पोहोचण्यापूर्वीच अपहरणकर्ते वाहनातून उतरून पळून जाण्यात यशस्वी झाले. सुदैवाने या कारमध्ये असलेला व्यापाऱ्याचा 18 वर्षीय मुलगा पोलिसांना सुरक्षित अवस्थेत सापडला. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेऊन त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. अपहरणकर्त्यांनी भरवस्तीतून तरुणाला पळवून नेण्याचे धाडस केल्याने या प्रकरणामागे नक्की काय कारण असावे, याबाबत आता पोलीस कसून तपास करत आहेत.
पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू
या थरारक घटनेनंतर जेजुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी माहिती दिली की, ग्रामस्थांचे सहकार्य आणि पोलिसांनी वेळीच केलेली नाकाबंदी यामुळे मुलाला वाचवणे शक्य झाले. पळून गेलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्यांना अटक केली जाईल. या कटात नेमके किती लोक सामील होते आणि हा प्रकार आर्थिक व्यवहारातून झाला की वैयक्तिक वादातून, याचा शोध आता घेतला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world