अजिंक्य पाटील, प्रतिनिधी
Pune News : चारित्र्यावर संशय घेत ‘फक्त मुलीच होतात, मुलगा होत नाही' या विकृत मानसिकतेतून एका पतीने २४ वर्षीय पत्नीला अमानुष मारहाण करून तिच्या गुप्तांगावर ॲसिड ओतल्याची धक्कादायक घटना उरुळी कांचन (ता. हवेली) येथे उघडकीस आली आहे. क्रौर्याचा कळस म्हणजे या कृत्यानंतर आरोपीने पीडितेला रुग्णालयात न नेता तब्बल १५ दिवस घरातच डांबून ठेवले होते.
असह्य वेदनेने महिला जिवाच्या आकांताने ओरडत राहिली...
याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून उरुळी कांचन पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना २० एप्रिल रोजी घडली. पीडितेचा पती मद्य पिऊन घरी आला आणि ‘तू कामावर जातेस, तुझे बाहेर कोणाशी अनैतिक संबंध आहेत ते सांग,' असे म्हणत त्याने शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर धमकी देत त्याने ॲसिडची बाटली आणून तिच्या गुप्तांगावर ओतले. असह्य वेदनेने महिला जिवाच्या आकांताने ओरडत होती. तिने घराबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नराधमाने घराचा दरवाजा आतून बंद करून तिला पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पीडितेचा आरडाओरडा ऐकून शेजारी राहणाऱ्या तिच्या जावेने सासू-सासऱ्यांना फोन करून बोलावले. मात्र, तोपर्यंत आरोपीने याबद्दल कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देत घरातून पळ काढला.
अखेर, ९ मे रोजी शनिवारी पती कामावर गेल्याची संधी साधून पीडितेने आपल्या दोन्ही मुलींना सोबत घेतले आणि थेट माहेर गाठले. तिथे तिने घडलेला सर्व प्रकार नातेवाईकांना सांगितला. या घटनेने हादरलेल्या नातेवाईकांनी तिला उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून पीडितेला तत्काळ उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर पीडितेने १५ मे रोजी शुक्रवारी तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला, अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world