Pune News : पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरात महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका कपड्याच्या दुकानात कपडे बदलणाऱ्या महिलेचे छुप्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केल्याप्रकरणी दुकानदाराला अटक करण्यात आलीम आहे.
चेंजिग रूममध्ये कॅमेरा...
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला कामशेत येथील एका दुकानात खरेदीसाठी गेली होती. यावेळी दुकानदार मुकेश मुथा याने तिला कपडे ट्राय करण्यासाठी स्टोअर रूममध्ये पाठवले. त्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरा आहे हे माहिती असूनही आरोपीने जाणीवपूर्वक महिलेची गोपनीयता भंग करून तिचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले. जेव्हा पीडित महिलेला या प्रकाराचा संशय आला आणि तिने जाब विचारला, तेव्हा आरोपीने तिला कोणाकडेही वाच्यता न करण्यासाठी धमकावले आणि दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने न घाबरता धैर्याने कामशेत पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
महिलेच्या तक्रारीवरून कामशेत पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपी मुकेश मुथा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७७ आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी अशा विकृत प्रवृत्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world