Pune News : पुण्यातून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पुण्यातील सॅलिसबरी पार्क परिसरातील ६१ वर्षीय उद्योजक गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह ९ मे रोजी डेक्कन भागातील आपटे रोडवरील एका हॉटेलच्या खोलीत सापडला. शुक्रवारी संध्याकाळी ते घरी न परतल्यामुळे आणि फोनला प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर त्यांची शोधाशोध सुरू झाली. अखेर शुक्रवारी डेक्कन परिसरातील हॉटेलमधील मृतदेह त्या व्यावसायिक व्यक्तीचा असल्याचं उघड झालं आहे.
डेक्कन जिमखाना पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खोलीत प्रवेश केला असता, हा उद्योजक मृतावस्थेत आढळला. खोलीत अनेक ठिकाणी उलट्या झाल्याच्या खुणा दिसून आल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या उद्योजकाने विषारी पदार्थाचं सेवन केलं असावे असा प्राथमिक संशय आहे. घटनास्थळाची परिस्थिती पाहता ही आत्महत्या असावी असं वाटते, त्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांनी सांगितले.
व्यावसायिकाच्या मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी...
मृत उद्योजकाचा कापड उद्योग आणि साखर कारखानदारी अशा विविध क्षेत्रांत व्यवसाय होता. हॉटेलच्या खोलीची झडती घेतली असता पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. ज्यामध्ये आर्थिक चणचण आणि इतर वैयक्तिक समस्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलीस आता त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीने आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित व्यक्तींकडून अधिक माहिती घेत आहेत. स्वारगेट पोलिसांनी सांगितलं की, शुक्रवारी सकाळी ते घरातून बाहेर पडले होते आणि संपर्क होऊ न शकल्याने कुटुंबीयांनी शहरभर शोध घेऊन अखेर पोलिसांत धाव घेतली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world