अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी
Pune News : पुण्यातील नवले पूल भागात एका व्यावसायिकाची गाडी अडवून तब्बल १ कोटी रुपयांची रोकड लुटण्याच्या प्रकरणाला खळबळजनक वळण लागलं आहे. या दरोड्याच्या गुन्ह्यात नऱ्हे पोलिसांनी एका तोतया पत्रकाराला बेड्या ठोकल्या आहेत. तर ग्रामीण पोलीस दलातील राजगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खेड शिवापूर पोलीस चौकीतील एका महिला पोलीस हवालदारासह पोलीस शिपायाला या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आलं आहे. सध्या हे दोघे फरार असल्याची माहिती आहे.
पुण्यात एक कोटी रुपयांच्या दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पण तोतया पत्रकारासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं बिंग फुटलं. या प्रकरणात पोलिसचं दरोडेखोरांच्या भूमिकेत होते का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. याबाबत फिर्यादी हर्षवर्धन पवार यांनी नऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात एकूण ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका हा प्रकार आहे तरी काय?
हा सगळा प्रकार, १८ जुलै रोजी पुण्यातील नवले पूल परिसरात घडला. फिर्यादी पवार हे सहकारी किरण आपटे यांच्यासह एका वाहनाने नवले पुलाजवळ असलेल्या बँकेच्या दिशेने जात असताना काही जणांनी त्यांचं वाहन अडवलं. “आम्ही पोलीस आहोत, तुम्ही बेकायदेशीर पैसे घेऊन जात आहात,” असे सांगत आरोपींनी गाडीचे दरवाजे उघडण्यास भाग पाडले आणि वाहनातील एक कोटी रुपयांची रोकड असलेल्या दोन बॅगा हिसकावण्याचा प्रयत्न केला.
यावेळी आपटे यांनी ७३ लाख रुपयांची बॅग घेऊन ते निघून गेले आणि ही रक्कम वाचली. या नंतर आरोपी पवार यांच्या गाडीत बसून त्यांना थेट खेड शिवापूर पोलीस चौकीत घेऊन गेले. त्याठिकाणी त्यांच्या ताब्यातील दुसऱ्या बॅगेतील २६.५० लाख रुपयांपैकी २० लाख रुपये काढून घेण्याचा प्रयत्न झाला. महिला पोलिसाच्या मदतीने आणि एका पत्रकाराने ती रक्कम स्वत:च्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. मात्र प्रकरण आपल्यावर येऊ नये म्हणून त्यांनी ती रक्कम पुन्हा बॅगेत ठेवली. खेड शिवापूर पोलीस चौकीत सीसीटीव्ही कॅमेरे नसले तरी समोरील हॉटेलमधील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला.
खाकीला डाग! पोलिसांचा सुद्धा या कटात सहभाग
सुरुवातीला दोन पोलिसांची आणि तोतया पत्रकाराची नावं गुन्ह्यातून टाळली गेली. मात्र नंतर पुरवणी गुन्ह्यात ती नावं पोलिसांना समाविष्ट करावी लागली. अटक करण्यात आलेल्या पत्रकाराचं नाव आशिष तिवारी असून याप्रकरणात यापूर्वीच विक्रम चाकणकर, अमेय कार्ले आणि गणेश कदम यांना अटक करण्यात आली आहे.
नवले पूल तसेच इतर भागांचे सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांच्या दरवाजापर्यंत ही चक्रे फिरली आहेत. तपासादरम्यान राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित इरफू मेस्री यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी एकूण ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील चौघांना अटक ही करण्यात आली आहे. मात्र दोन पोलीस कर्मचारीसह सहा जण अजूनही फरार आहेत.