Pune Shivshahi Bus Crime : पुण्यातील स्वारगेट बस स्टँडवरील शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कारानंतर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. मूळात बस स्टँडवर ती बस का उभी होती? बस लॉक का करण्यात आली नव्हती? असे अनेक प्रश्न निरुत्तरीत आहेत. आता या प्रकरणात नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. पुण्यातील ज्या बसमध्ये तरुणीवर अत्याचाराची घटना घडली ती बस खाजगी मालकीची असल्याचं समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गेल्या अनेक दिवसांपासून ही बस आगारातच उभी होती. मात्र नियमाप्रमाणे 24 तासांपेक्षा जास्त वेळ बस आगारात ठेवता येत नाही. मात्र ही बस गेल्या अनेक दिवसांपासून स्वारगेट बस स्टँडवर उभी होती.
बसच्या खिडक्यांना काळ्या काचा...
धक्कादायक बाब म्हणजे या शिवशाही बसच्या खिडक्यांना काळ्या रंगाच्या काचा होत्या. खिडक्यांच्या काचांना काळ्या रंगाची फिल्म असल्यामुळे बाहेरच्यांना आत काहीच दिसत नव्हतं. गाडीच्या काचांवर काळ्या फिल्मचा वापर बेकायदेशीर आहे. काळ्या काचांमुळे बाहेरच्यांना आतील दृश्य, प्रवासी दिसत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने 2012 मध्ये यासंदर्भात आदेश जारी केला होता. त्यानुसार, गाडीच्या पुढील आणि मागील काचांची पारदर्शकता 70 टक्के आणि बाजूच्या खिडक्यांची 50 टक्के असावी. सध्या, अनेक गाड्यांवर काळ्या फिल्मचा वापर सुरू आहे. ज्यातून अघटित घटना घडण्याची भीती असते. पोलिसांकडून याबाबत चौकशी सुरू आहे. काळ्या रंगाच्या काचा आढळल्यास नियमांचे उल्लंघन केल्यामुळे वाहनधारकांना फक्त 100 रुपये दंड भरावा लागतो. त्यामुळे बरेच लोक या नियमांचे पालन करत नसल्याचं दिसून येतं. काळ्या फिल्ममुळे गाडीच्या आतल्या गोष्टी लपवता येतात, ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो.