
राकेश गुडेकर, प्रतिनिधी
Ratnagiri Chiplun murder case : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात सेवानिवृत्त शिक्षिकेचा मृतदेह घरातच पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या शिक्षिकेची हत्या करण्यात आली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात एका जवळच्या व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
चिपळूण तालुक्यात धामणवणे खोतवाडी येथे जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी (वय 63) यांचा मृतदेह घरातच पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला. गुरुवारी (7 ऑगस्ट 2025) सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने मृतदेहाजवळून थेट धामणवणे रस्त्याने डोंगरावरील एका फार्महाऊसपर्यंत धाव घेतल्याने मारेकरी जंगलाच्या दिशेने पळाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
( नक्की वाचा : Love Story: नवरा गंगास्नानासाठी गेला तेवढ्यात बायको प्रियकरासोबत झाली फुर्रर्रर्र.... वाचा काय आहे भानगड! )
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, या प्रकरणी एका जवळच्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. हा खून कोणी आणि कोणत्या कारणासाठी केला, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
प्रवासाची तयारी असताना घडला प्रकार
मूळच्या गोंधळे येथील रहिवासी असलेल्या वर्षा जोशी या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या पतीचे 2011 मध्ये निधन झाले होते. सहा वर्षांपूर्वी त्या जिल्हा परिषद शाळेतून सेवानिवृत्त झाल्या होत्या आणि धामणवणे खोतवाडी येथील घरी त्या एकट्याच राहत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा जोशी गुरुवारी त्यांच्या मैत्रिणींबरोबर हैद्राबाद विठापूर येथे सहलीसाठी जाणार होत्या. त्यांनी त्यासाठी सर्व तयारीही केली होती. बुधवारपर्यंत त्या सर्वांच्या संपर्कात होत्या, मात्र बुधवारी रात्रीनंतर त्यांचा संपर्क झाला नाही. त्यांच्या मैत्रिणी तोरस्कर यांनी बुधवारी रात्री त्यांना वारंवार फोन केला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी वर्षा जोशी यांचे शेजारी शिरीष चौधरी यांना फोन करून माहिती घेण्यास सांगितले.
जोशी यांच्या घराचा दर्शनी दरवाजा आतून बंद असल्याने संशय बळावला. त्यानंतर शेजारी आणि गावाच्या सरपंचांनी मागील दरवाजा पाहिला असता, तो उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेजाऱ्यांनी घरात प्रवेश करताच वर्षा जोशी यांचा पाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आणि हा सर्व धक्कादायक प्रकार उघड झाला पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. पोलीस तपासातून सत्य कधी समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world