जाहिरात

Ratnagiri News: चांदण्याने छळले, सोसाट्याच्या वाऱ्याने मासे पळवले; रत्नागिरीतील मच्छिमार वैतागले

Ratnagiri News: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा फटका बसल्याने मच्छीमार चिंतेत असतानाच आता जोरदार वाऱ्याने परिस्थिती अधिकच बिकट केली आहे. समुद्रात सुसाट सुटलेल्या वाऱ्यामुळे मच्छीमारी करणे आता धोक्याचे झाले आहे.

Ratnagiri News: चांदण्याने छळले, सोसाट्याच्या वाऱ्याने मासे पळवले; रत्नागिरीतील मच्छिमार वैतागले
प्रतिकात्मक फोटो

राकेश गुडेकर, रत्नागिरी

कोकणच्या किनारपट्टीवर निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका मच्छीमारी व्यवसायाला बसला आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या अस्मानी संकटामुळे जिल्ह्यातील मच्छीमार मेटाकुटीला आला असून, समुद्रात मासळीच मिळेनाशी झाली आहे. आधी पौर्णिमेचे चांदणे आणि आता समुद्रात सुटलेले वेगवान वारे यामुळे मच्छीमार नौका बंदरात उभ्या करण्याची वेळ आली आहे.

अस्मानी संकटाची मालिका

जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला 3 तारखेला असलेल्या पौर्णिमेमुळे मासळीचे स्थलांतर झाले. दरवर्षीच्या अनुभवाप्रमाणे पौर्णिमेच्या काळात मासळी खोल समुद्रात जात असल्याने मच्छीमारांच्या जाळ्यात फारशी मासळी लागली नाही. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हा फटका बसल्याने मच्छीमार चिंतेत असतानाच आता जोरदार वाऱ्याने परिस्थिती अधिकच बिकट केली आहे. समुद्रात सुसाट सुटलेल्या वाऱ्यामुळे मच्छीमारी करणे आता धोक्याचे झाले आहे. वाऱ्याच्या वेगामुळे समुद्रात टाकलेली महागडी जाळी एकमेकांत गुरफटून तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पदरात मासळी तर पडत नाहीच, उलट जाळ्यांच्या दुरुस्तीचा मोठा आर्थिक भुर्दंड मच्छीमारांना सहन करावा लागत आहे.

(नक्की वाचा-  Bank Strike: बँकांचा आज देशव्यापी संप, कोण-कोणत्या बँका होणार सहभागी? काय आहेत मागण्या?)

खर्च अवाढव्य, उत्पन्न शून्य

​एका मासेमारी नौकेला समुद्रात जाण्यासाठी डिझेल (इंधन), खलाशांचे मानधन, रेशन आणि मासळी टिकवण्यासाठी लागणारा बर्फ असा लाखो रुपयांचा खर्च येतो. मात्र, सध्या मासळी इतकी कमी मिळत आहे की, झालेला खर्च निघणेही कठीण झाले आहे. परिणामी, अनेक नौकामालकांनी अर्ध्यावर मासेमारी सोडून आपल्या नौका मिरकरवाडा आणि इतर बंदरात परत आणल्या आहेत.

​मच्छीमार्केटमध्ये शुकशुकाट; खवय्यांची पाठ

​या संपूर्ण परिस्थितीचा थेट परिणाम स्थानिक मच्छीमार्केटवर झाला आहे. सुट्टीचा दिवस असूनही मासळीच्या चढ्या दरामुळे मार्केटमध्ये ग्राहकांचा शुकशुकाट पाहायला मिळाला. बाजारात 'पापलेट'चे दर्शन तर दुर्मिळच झाले आहे, तर इतर मासळीचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत.

(नक्की वाचा- Solapur News: जि.प. निवडणुकीसाठी लंडनच्या बॅरिस्टर पदवीचा त्याग; 24 वर्षांच्या या उमेदवाराची जोरदार चर्चा)

बाजारातील सध्याचे अंदाजित दर (प्रति किलो)

  • ​सुरमई: 800 ते 900 रुपये
  • ​मोठा सरंगा: 650 ते 700 रुपये
  • ​व्हाईट कोळंबी: 500 ते 600 रुपये
  • ​सौंदाळे: 300 ते 350 रुपये
  • ​बांगडा: 200 रुपये

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com