
राकेश गुढेकर
राज्याच्या पर्यटन आणि शांततापूर्ण जिल्ह्यांपैकी एक असलेल्या रत्नागिरी शहरात वेश्या व्यवसायाचे जाळे पसरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या एका मोठ्या कारवाईत मिरजोळे एमआयडीसी येथील एका घरात चालणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एक नेपाळी महिलेला अटक केली असून, पुण्याहून आणलेल्या दोन तरुणींची या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. या घटनेमुळे रत्नागिरीसारख्या सुसंस्कृत शहराच्या प्रतिमेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
पोलिसांनी कसे उघडकीस आणले सेक्स रॅकेट
गेल्या काही दिवसांपासून मिरजोळे एमआयडीसी परिसरात एका घरात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी सकाळी एक सापळा रचला. गुन्हे शाखेच्या पथकाने एका बनावट गिऱ्हाईकाला आत पाठवून खात्री केली. घरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी दोन तरुणी आणि नेपाळी महिला गीता (वय अंदाजे 35) हिला रंगेहाथ पकडले. चौकशीदरम्यान, दोन्ही तरुणी पुण्याच्या रहिवासी असून, त्यांना पैशांचे आमिष दाखवून या व्यवसायात आणले असल्याचे समोर आले. या दोघींना नेपाळी महिला गीता हिनेच रत्नागिरीत आणले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सेक्स रॅकेट उघडकीस येण्याची चौथी घटना
पोलिसांनी घटनास्थळावरून 2,500 रुपये रोख आणि एक मोबाईल फोन जप्त केला. पोलिसांनी नेपाळी महिलेविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर अंकुश बसवण्यास मदत झाली आहे. पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. या पथकात सहायक महिला पोलीस निरीक्षक शबनम मुजावर, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ, भैरवनाथ सवाईराम, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वाती राणे, शितल कांबळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल पाटील आणि पोलीस नाईक दत्ता कांबळे यांचा समावेश होता. ही घटना रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांतील चौथी घटना आहे. यापूर्वी ओसवालनगर, सिद्धिविनायक नगर आणि खेडशी येथेही अशाच प्रकारे वेश्या व्यवसायाचे रॅकेट उघडकीस आले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world