Yash Dayal Rape Case Update : आरसीबीचा फास्ट बॉलर यश दयाल मोठ्या संकटात सापडलाय. त्याला जयपूरच्या पॉक्सो कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. बलात्कार प्रकरणात अडकलेल्या यश दयालचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे.या प्रकरणाची सुनावणी करताना पॉक्सो कोर्टाच्या जज अलका बंसल यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली.
प्रथमदर्शनी असे वाटत नाही की यशला खोट्या आरोपात अडकवण्यात आले आहे आणि आतापर्यंतच्या तपासात त्याच्या गुन्ह्यातील सहभागाचे पुरेसे संकेत मिळत आहेत, असे कोर्टाने म्हटले आहे. यशची सविस्तर चौकशी अद्याप बाकी असल्याने त्याला या टप्प्यावर जामीन देता येणार नाही, असा निर्णय कोर्टाने दिला आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणाची माहिती अशी की, एका अल्पवयीन पीडितेने सांगानेर सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. क्रिकेटमध्ये करिअर करून देण्याचे आमिष दाखवून आणि भावनिक ब्लॅकमेल करून यशने तब्बल अडीच वर्षे तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे. पीडितेचे वकील दिवेश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पीडिता आणि यश या दोघांचे मोबाइल फोन आणि सीडीआर जप्त केले आहेत. यामध्ये दोघांमध्ये सतत संभाषण होत असल्याचे समोर आले आहे.
(नक्की वाचा : Video: भारताचा पराभव होताच पाकिस्तानी फॅन्सची मुजोरी; 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला घेरलं, पाहा त्याचं उत्तर )
या तपासादरम्यान पीडितेने सांगितलेल्या वेगवेगळ्या हॉटेलमधील रेकॉर्ड्सची तपासणी केली असता, दोघेही तिथे वास्तव्यास असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. पीडितेच्या मोबाइलमधील चॅट्स, फोटो आणि व्हिडिओच्या आधारे यशविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, 3-4 मे रोजी जयपूरमध्ये आयपीएल मॅच सुरू असताना यशने पीडितेला रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये बोलावले आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये तिला कानपूरला बोलावून तिथे हॉटेलमध्ये जबरदस्तीने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दुसरीकडे, यश दयालच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यश पीडितेला नेहमी सार्वजनिक ठिकाणी आणि टीममधील इतर सदस्यांच्या उपस्थितीतच भेटला असून तो कधीही तिला एकांतात भेटला नाही, असा दावा वकील कुणाल जैमन यांनी केला आहे.
(नक्की वाचा : T20 World Cup 2026 : टीम इंडियातून Shubman Gill आऊट! बीसीसीआयचा मोठा निर्णय; नेमकं कुठं बिनसलं? Inside Story )
पीडितेने स्वतःला सज्ञान सांगून आर्थिक अडचणीचे कारण दिले आणि क्रिकेट किट खरेदी करण्याच्या नावाखाली यशकडून पैसे घेतले, असा युक्तिवाद त्यांनी केला. पीडिता वारंवार वेगवेगळ्या बहाण्याने पैशांची मागणी करत होती आणि ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने तिने ही तक्रार केल्याचे यशच्या वकिलांचे म्हणणे आहे. मात्र, कोर्टाने सध्या तरी यशला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world