जाहिरात

Sambhajinagar : विहीर बनली दफनभूमी; संभाजीनगरमधील 2 सख्ख्या भावांसह वडीलही गाडले गेले, गाव हादरलं!

छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे शनिवारी रात्री एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे.

Sambhajinagar : विहीर बनली दफनभूमी; संभाजीनगरमधील 2 सख्ख्या भावांसह वडीलही गाडले गेले, गाव हादरलं!

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे शनिवारी रात्री एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. विहिरीत उतरून मोटर पंप बसवण्याचे काम सुरू असताना अचानक विहीर खचली आणि त्याखाली दबून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला. बाजीराव सर्जेराव काकडे, आजिनाथ बाजीराव काकडे आणि शाम बाजीराव काकडे अशी मृतांची नावे असून, या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. रात्री साडे नऊच्या सुमारास घडलेल्या या अपघाताने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून एकाच वेळी घरातील तीन आधारस्तंभ गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

​बाप अन् दोन मुलांचा दुर्दैवी शेवट

​ही घटना केवळ अपघात नसून एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर कोसळलेला दुःखाचा डोंगर आहे. बाजीराव काकडे आणि त्यांची दोन तरुण मुले आजिनाथ आणि शाम हे तिघेही अतिशय कष्टाळू आणि मनमिळावू होते. आपल्या शेतात विहिरीचं काम करत असताना नियतीने त्यांच्यावर असा घाला घातला की, त्यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. विहीर खचल्याचा आवाज होताच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्याने या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. कष्टाळू हातांचा असा दुर्दैवी शेवट पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आलं.

नक्की वाचा - Kalyan News : कल्याणमधील हायप्रोफाइल परिसरात कारचालकाचं अश्लील कृत्य; महिलांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

धानोरा ​गावावर शोककळा

​आज सकाळी ११ वाजता धानोरा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेमुळे आज सकाळपासूनच संपूर्ण धानोरा गावात शांतता पसरली असून प्रत्येकाच्या मुखात काकडे कुटुंबाच्या आठवणी आहेत. मेहनती आणि सर्वांशी प्रेमाने वागणारं हे कुटुंब अशा प्रकारे काळाच्या पडद्याआड जाईल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. या दुर्घटनेमुळे केवळ काकडे परिवारच नाही, तर संपूर्ण गाव पोरके झाले असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com