Kalyan News : कल्याणमधील गुन्हेगारीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अनेकदा हाणामारी-हत्येच्या घटना आपण पाहिल्या असतील, मात्र आता तर मर्यादाच ओलांडल्याचं दिसून येत आहे. कल्याणमधील हायप्रोफाईल वायले नगर परिसरात महिलांसमोर एका कार चालकाने भररस्त्यात लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित चालकावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
कारचालकाचं घृणास्पद कृत्य...
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेदहाच्या सुमारास एका दुकानासमोर ट्रॅव्हल्स कार येऊन थांबली. त्या दुकानात महिला उपस्थित होत्या. कार चालक खाली उतरला आणि जवळच्या दुकानातून पाण्याची बाटली खरेदी केली. त्यानंतर तो कारसमोर जाऊन उघड्यावर अक्षरश: फुटपाथच्या शेजारी लघुशंका करू लागला. येथे नेहमीच मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी कारचालकाच्या कृत्याने तेथील महिला संतापल्या. हा प्रकार पाहून दुकानातील महिलांनी आणि स्थानिकांनी त्याला जाब विचारला. मात्र चालकाने उलट महिलांनाच शिवीगाळ केली आणि कारमध्ये बसून घटनास्थळावरून पसार झाला.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर...
या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी राजेश लोंढे यांनी संबंधित कारचा फोटो आणि नंबर कल्याण वाहतूक विभागाला पाठवला आहे. तसेच या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात येथे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. घटनेनंतर महिलांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. “दिवसाढवळ्या अशा घटना घडत असतील तर महिलांच्या सुरक्षेचे काय?” असा सवाल स्थानिक महिलांनी उपस्थित केला आहे. संबंधित चालकाला तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. आता या प्रकरणात कल्याण वाहतूक पोलीस आणि खडकवाड पोलीस कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार चालकाला ताब्यात घेऊन पोलिसांनी पाठवलं कोर्टात
कल्याणमध्ये भर रस्त्यात महिलांसमोर लघुशंका करणाऱ्या कार चालकाला खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रीतम पांडे असं या कारचालकाचं नाव आहे. प्रीतम पांडे याचं म्हणणं आहे की, मी तिकडे लघुशंका केली नाही फक्त तोंड धुतलं. मात्र काही वेळाने त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात पोलिसांनी त्याला नोटीस बजावून कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. पुढील तपास सुरू आहे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world