जाहिरात

Satara Doctor Case: ''मुलीच्या मारेकऱ्याला फाशी द्या!", साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या वडिलांची रडत-रडत मागणी

Satara Doctor Case: साताऱ्यामधील मृत महिला डॉक्टराच्या वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भावनिक आणि कठोर मागणी केली आहे.

Satara Doctor Case: ''मुलीच्या मारेकऱ्याला फाशी द्या!", साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या वडिलांची रडत-रडत मागणी
Satara Doctor Case: "माझ्या मुलीच्या मारेकऱ्याला फाशी द्या, '' अशी मागणी त्यांच्या वडिलांनी केली आहे.
मुंबई:

Satara Doctor Case: सातारा जिल्ह्यातल्या फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. 23 ऑक्टोबरच्या रात्री एका हॉटेलमध्ये आत्महत्या केलेल्या या डॉक्टरच्या आत्महत्येमागे अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या सुसाईड नोटमध्ये एका पोलिस उपनिरीक्षकाने चार वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप असून, एका खासदाराचा (MP) आणि त्यांच्या खासगी सचिवाचा (PA) उल्लेख असल्याचे समोर आले आहे.

या गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात न्याय मिळावा यासाठी मृत डॉक्टरचे वडील आणि भावाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भावनिक आणि कठोर मागणी केली आहे. "माझ्या मुलीच्या मारेकऱ्याला फाशी द्या, जेणेकरून दुसऱ्या कोणत्याही मुलीसोबत असे होणार नाही," अशी आर्त विनवणी वडिलांनी केली आहे.

बलात्कार आणि मानसिक छळाचा आरोप

साताऱ्यातील लेडी डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे. सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत डॉक्टरच्या हातालवर काही नावे लिहिलेली आढळली. तसेच, 'सुसाईड नोट'मध्ये त्यांनी उपनिरीक्षक पदावर तैनात असलेला पोलीस कर्मचारी गोपाल बदाने याने त्यांच्यावर 4 (चार) वेळा बलात्कार केल्याचा उल्लेख केला आहे. तर, सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचेही डॉक्टरने म्हटले आहे.

( नक्की वाचा : Satara Doctor Case : 'तो' खासदार कोण? मानसिक छळानंतर महिला डॉक्टरची आत्महत्या; वाचा संपूर्ण खळबळजनक पत्र )

पोलीस अधीक्षक (SP) दोशी यांनी सांगितले की, या दोघांविरुद्ध बलात्कार आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

'सुसाईड नोट'मध्ये खासदाराचा उल्लेख

गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाला वेग मिळत असतानाच, मृत डॉक्टरने लिहिलेले 4 (चार) पानांचे एक महत्त्वाचे पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे. या पत्रात एका खासदाराचा (MP) आणि त्यांच्या खासगी सचिवाचा (PA) उल्लेख आहे. मात्र, पत्रात त्यांची नावे स्पष्टपणे लिहिलेली नाहीत. या खासदाराचा आणि त्यांच्या सचिवाचा या प्रकरणात नेमका काय संबंध आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

याशिवाय, पोलीस कर्मचारी डॉक्‍टरवर पोस्टमार्टम रिपोर्ट (Postmortem Report) बदलण्याचा आरोप करत होते, ज्यामुळे डॉक्टर खूप तणावात होत्या, अशीही माहिती समोर आली आहे.

( नक्की वाचा : Satara Doctor Case: महिला डॉक्टर आत्महत्येमध्ये एक नवं पत्र उघड, खासदार आणि PA चा ही पत्रात उल्लेख )

प्रेम प्रकरणातून वाद? 

या प्रकरणातील आरोपींपैकी एक असलेल्या प्रशांत बनकरच्या बहिणीने (स्वाती जाधव) वेगळा दावा केला आहे. एनडीटीव्हीशी बोलताना तिने सांगितले की, मृत महिला डॉक्टरला प्रशांत बनकरशी लग्न करायचे होते आणि तिने काही दिवसांपूर्वी त्याला 'प्रपोज'ही केले होते.

प्रशांतची बहीण स्वाती जाधव यांच्या दाव्यानुसार, प्रशांत लग्नासाठी तयार नव्हता, ज्यामुळे त्यांच्यात वाद सुरू होता. बी-टेक (B.Tech) असलेला प्रशांत बनकर मुंबईत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करतो. पोलिसांनी त्याला अटक केली आहे, तर बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेला पोलीस कर्मचारी गोपाल बदाने अद्याप फरार आहे. बदानेवर विभागाने तातडीने विभागीय कारवाई केली आहे.

न्यायासाठी वडिलांची भावनिक साद: 'फाशीची शिक्षा द्या'

या दुःखद घटनेनंतर मृत महिला डॉक्टरचे वडील आणि भावाने थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. भावूक झालेल्या वडिलांनी माध्यमांसमोर रडत मागणी केली की, "आरोपींना मृत्यूची शिक्षा (फाशीची शिक्षा) द्या, म्हणजे जे माझ्या मुलीसोबत घडले, ते दुसऱ्या कोणत्याही मुलीसोबत घडणार नाही. माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे."

मृत डॉक्टरचे कुटुंब या घटनेमुळे खूप दुःखी आहे. दिवाळीसाठी घरी येणार असलेली त्यांची मुलगी आता कायमची सोडून गेली, या विचाराने कुटुंबीय पूर्णपणे खचले आहेत. पीडितेला न्याय मिळावा यासाठी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी (SIT) मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com