Satara Doctor Suicide Case : साताऱ्यामध्ये 28 वर्षीय महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे या तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. मृत्यूपूर्वी डॉक्टरने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या आरोपींपैकी एकाला एक गंभीर मेसेज (Text Message) पाठवला होता. या मेसेजमध्ये ती अत्यंत तणावात होती आणि टोकाचे पाऊल उचलण्याची तिची तयारी होती, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मृत्यूच्या काही तास आधी ही डॉक्टर आरोपी प्रशांत बनकरच्या घरी लक्ष्मी पूजनाला उपस्थित होती. तिथे झालेल्या वादामुळे ती घर सोडून गेली आणि त्यानंतर तिने हॉटेलात चेक-इन केले, जिथे तिचा मृतदेह आढळला.
हॉटेलात आढळला मृतदेह, दोन आरोपींना अटक
दुसऱ्या दिवशी या डॉक्टरचा मृतदेह हॉटेलातील खोलीत आढळला. मृत्यूपूर्वी डॉक्टरने आपल्या हातावर एक चिठ्ठी लिहिली होती, ज्यात तिने आता निलंबित करण्यात आलेला पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदाणे याच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. तसेच, घरमालकाचा मुलगा असलेला सॉफ्टवेअर इंजिनिअर प्रशांत बनकर याच्यावर दीर्घकाळ मानसिक छळ केल्याचा आरोपही तिने केला होता. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
( नक्की वाचा : Satara Doctor Case : 'तो' खासदार कोण? मानसिक छळानंतर महिला डॉक्टरची आत्महत्या; वाचा संपूर्ण खळबळजनक पत्र )
सातारा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी डॉक्टर आणि आरोपी बदाणे आणि बनकर यांच्यातील संभाषणाचे (Chats) पुरावे हस्तगत केले आहेत. डॉक्टरचे बदाणेसोबतचे संभाषण मार्च महिन्यात थांबले होते, मात्र बनकरसोबत तिचा संपर्क कायम होता आणि आत्महत्येपूर्वी ती त्याच्या घरी होती. यापूर्वी डॉक्टर आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्यातील वाद एका बैठकीद्वारे मिटवण्यात आला होता, अशी माहितीही तपासात पुढे आली आहे.
पूजेदरम्यान नेमका काय वाद झाला?
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना या घटनेतील काही महत्त्वाचे तपशील उघड केले. चाकणकर म्हणाल्या की, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मृत डॉक्टर बनकरच्या घरी होती. "वरवर पाहता, फोटो व्यवस्थित न काढल्यामुळे दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादामुळे डॉक्टर घर सोडून निघून गेली. बनकरच्या वडिलांनी तिला परत घरी आणले, परंतु थोड्याच वेळात ती पुन्हा बाहेर पडली आणि एका लॉजमध्ये जाऊन राहिली," असे चाकणकर यांनी सांगितले.
चाकणकर यांनी पुढे सांगितले की, डॉक्टर आणि आरोपींचे कॉल रेकॉर्ड्स तपासले असता, डॉक्टर मार्च महिन्यापर्यंत पीएसआय बदाणेच्या संपर्कात होती आणि त्यानंतर त्यांच्यात कोणतेही संवाद झाला नव्हता. परंतु, डॉक्टरने बनकरला अनेक संदेश पाठवले होते आणि ती टोकाचे पाऊल उचलणार असल्याचे संकेतही दिले होते. त्या रात्री तिने बनकरला कॉलही केला होता. शवविच्छेदन अहवालाच्या प्राथमिक तपासणीनुसार, ही आत्महत्या गळफास घेऊन केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा पोलीस प्रमुख दोशी यांनीही घटनेपूर्वी डॉक्टर बनकरच्या संपर्कात होती आणि त्यांच्यात संदेशांची देवाणघेवाण झाली होती, याला दुजोरा दिला आहे. पीएसआय बदाणेवरील बलात्काराच्या आरोपांचीही चौकशी सुरू आहे आणि त्यांचे संयुक्त ठिकाण (Joint Locations) व संदेश तपासले जात आहेत.
तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप
मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी डॉक्टरने बदाणे आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या छळाबद्दल तक्रारी केल्या होत्या, पण त्यावर योग्य पाठपुरावा झाला नाही. आता या तक्रारींकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. 19 जून रोजी डॉक्टरने फलटण येथील पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे बदाणे आणि इतर अधिकाऱ्यांविरुद्ध लेखी तक्रार दिली होती.
या तक्रारीत तिने आरोप केला होता की, पोलीस अधिकारी गुन्हेगारी प्रकरणांतील आरोपींना खोटे तंदुरुस्ती प्रमाणपत्र (False Fitness Certificates) देण्यासाठी तिच्यावर दबाव आणत होते. त्यानंतर फलटण ग्रामीण पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध प्रति-तक्रार दाखल केली, ज्यात डॉक्टरने "वैद्यकीय तपासात अडथळा" आणल्याचा आरोप केला गेला. डॉक्टरच्या अनेक पत्रांतून तिने कथित छळामुळे ती अत्यंत तणावात असल्याचे स्पष्ट केले होते.
डॉक्टरच्या मृत्यूनंतर आंदोलन करणारे लोक सिस्टीमच्या अपयशाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. वारंवार तक्रार करूनही तिच्याकडे दुर्लक्ष झाले आणि त्यामुळे तिला टोकाचे पाऊल उचलावे लागले, हे दुर्दैवी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
राजकीय खडाजंगी
या 28 वर्षांच्या डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला धारेवर धरले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या घटनेला "संस्थात्मक हत्या" असे म्हंटले आहे. ते म्हणाले, "इतरांचे दुःख दूर करण्याची आकांक्षा बाळगणारी एक होतकरू डॉक्टर, भ्रष्ट व्यवस्था आणि सत्ता संरचनेत खोलवर रुजलेल्या गुन्हेगारांच्या छळाची बळी ठरली. जनतेचे गुन्हेगारांपासून संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सत्तेनेच या निरागस महिलेवर बलात्कार आणि शोषणासारखा घृणास्पद गुन्हा केला. जेव्हा सत्ताच गुन्हेगारांसाठी ढाल बनते, तेव्हा कोणाकडून न्यायाची अपेक्षा करायची?"
याउलट, मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर या घटनेचे राजकारण करण्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले, "पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व सत्य बाहेर येत आहे. आमच्या छोट्या भगिनीला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. पण प्रत्येक प्रकरणात काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करतात. ... हे आमच्या छोट्या भगिनीचे प्रकरण आहे ... कोणतीही तडजोड केली जाणार नाही."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world