राहुल तपासे, प्रतिनिधी
Satara Job Fraud Case: सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून साताऱ्यातील एका शेतकऱ्याला तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जावली तालुक्यातील महीगाव येथील या शेतकऱ्याची फसवणूक झाल्याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये मुंबईतील एका माजी नगरसेविकेसह मंत्रालयातील कर्मचारी आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या नावाचा समावेश असल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. नोकरीच्या नावाखाली फसवणुकीचे हे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण?
फिर्यादी शैलेश काशीनाथ पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हा सर्व प्रकार सप्टेंबर 2022 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत घडला आहे. आरोपींनी संगनमत करून पवार यांच्या मुलांना भारत सरकारच्या वंदे भारत ट्रेनमध्ये आणि महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते.
या विश्वासापोटी आरोपींनी सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर आणि मुंबई अशा विविध शहरांमध्ये रोख रक्कम, बँक ट्रान्सफर आणि युपीआयच्या माध्यमातून एकूण 1 कोटी 80 लाख रुपये उकळले.
( नक्की वाचा : Mulund Metro Pillar Collapse: इंजिनिअर्स काय करत होते? महापौरांनी झापले, घटनास्थळावरुनच मोठी घोषणा, VIDEO )
बनावट नियुक्तीपत्रे आणि खोट्या मुलाखती
फसवणुकीचा हा जाळा इतका मोठा होता की, आरोपींनी पीडित कुटुंबाचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या. रेल्वे खात्यात टीटीई पदासाठीची बनावट नियुक्तीपत्रे तयार करण्यात आली होती.
इतकेच नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागातील नोकरीसाठी खोट्या मुलाखतींचे आयोजन करणे, वैद्यकीय तपासण्यांचे नाटक करणे आणि अगदी शेवटी बनावट नेमणूक आदेश हातावर टेकवणे असे गंभीर प्रकार या प्रकरणात घडले आहेत. प्रत्यक्षात या सर्व कागदपत्रांचा सरकारी विभागांशी कोणताही संबंध नसल्याचे नंतर समोर आले.
या हायप्रोफाईल लोकांवर गुन्हा दाखल
या प्रकरणात मेढा पोलिसांनी गुन्हा क्रमांक 26/2026 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. तक्रारीत नमूद केलेल्या आरोपींमध्ये मुंबईच्या चेंबूर येथील नगरसेविका शरीफा टाटा खान, समीर चुंडमुंग, जहीर अमानुल्ला खान, इमाण अमानुल्ला खान, निलेश बाळकृष्ण ठाकूर, आनंद सिंग उर्फ बाबू शेठ उर्फ अंकल, रेणू रामू सिंग उर्फ रेणू निलेश ठाकूर यांचा समावेश आहे.
तसेच रेल्वे विभागाचे अधिकारी आशिष अगरवाल, बांधकाम विभाग मुंबईचे सुधीर गायकवाड, किशोर माळी आणि मंत्रालयातील कर्मचारी शामल मुखर्जी यांचीही नावे तक्रारीत देण्यात आली आहेत.
( नक्की वाचा : Love Story: 'ती' परत आली, पण नव्या ट्विस्टसह! जावयासोबत पळालेली सासू आता मेहुण्यासोबत गायब; नेमकं काय घडलं? )
पोलीस तपासाकडे राज्याचे लक्ष
एका शेतकऱ्याची एवढ्या मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याने सातारा जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.
शासकीय नोकरीच्या नावाखाली राज्यात पुन्हा एकदा बनावट भरती रॅकेट सक्रिय झाले आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या प्रकरणात राजकीय व्यक्ती आणि शासकीय कर्मचाऱ्यांची नावे आल्याने पोलीस आता नेमकी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world