राहुल तपासे, प्रतिनिधी
Satara News : सह्याद्रीतील वाघांची संख्या पुन्हा स्थिरावण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या वाघ पुनर्स्थापना प्रकल्पाला (Tiger Recovery Project) मोठं यश मिळत असल्याचं चित्र समोर आलं आहे. सह्याद्रीमध्ये नैसर्गिक अधिवास निर्माण केलेल्या STR-T1 (सेनापती) या नर वाघासोबत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतरित करण्यात आलेली STR-T4 (चंदा) या वाघिणीचा एकत्र वावर सुरू झाल्याची खात्री कॅमेरा ट्रॅप आणि वाघ संनियंत्रण पथकाच्या निरीक्षणातून झाली आहे.
सह्याद्री व्याघ्र राखीव, भारतीय वन्यजीव संस्था देहरादून (WII) आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) यांच्या संयुक्त सहकार्याने 2017 मध्ये वाघ पुनर्स्थापना प्रकल्प हाती घेण्यात आला होता. 2027 पर्यंत सह्याद्रीमध्ये इष्टतम व मुक्त श्रेणीतील वाघांची संख्या वाढवणे आणि पर्यावरणीय समतोल मजबूत करणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 2017 ते 2022 या कालावधीत भक्ष्य प्राण्यांची संख्या वाढविण्याचा कार्यक्रम (Prey Augmentation Program) यशस्वीपणे राबविण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वाघ पुनर्स्थापनेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. 9 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या NTCA च्या चौथ्या तांत्रिक समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
चंदा आणि ताराचे यशस्वी स्थलांतर...
या मंजुरीनुसार ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) आणि पेंच व्याघ्र प्रकल्प (PTR) येथून एकूण आठ वाघांचे (तीन नर व पाच मादी) सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये स्थलांतर करण्यास पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मान्यता दिली. त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करण्यात आली. गेल्या तीन वर्षांत सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये STR-T1 (सेनापती), STR-T2 आणि STR-T3 या तीन नर वाघांचा नैसर्गिक वावर नोंदविण्यात आला आहे. त्यांनी सह्याद्रीमध्ये आपले अधिवास निश्चित केले आहेत. मात्र नैसर्गिक प्रजनन प्रक्रियेसाठी मादी वाघांची आवश्यकता असल्याने ताडोबा येथून STR-T4 (चंदा) आणि STR-T5 (तारा) या वाघिणींचे यशस्वी स्थलांतर करण्यात आले.
सह्याद्री व्याघ्र राखीव (STR) साठी महत्त्वाचं...
सद्यस्थितीत चांदोली वन्यजीव विभागांतर्गत आंबा वनपरिक्षेत्रात मागील एक आठवड्यापासून STR-T1 (सेनापती) आणि STR-T4 (चंदा) यांचा एकत्र वावर सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा वावर जंगलातील नैसर्गिक वर्तनाचा भाग असून प्रजननाच्या दृष्टीने सह्याद्री व्याघ्र राखीव (STR) साठी ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. STR-T1 (सेनापती) या वाघाने सह्याद्रीमध्ये व्यापक क्षेत्रावर दबदबा निर्माण केला असून STR-T4 (चंदा) हिनेही त्याच अधिवास क्षेत्रात सुमारे 35 चौरस किलोमीटर परिसरात आपला नैसर्गिक वावर निश्चित केला आहे. या नर–मादी वाघांच्या एकत्र उपस्थितीमुळे सह्याद्रीमध्ये लवकरच वाघांची नैसर्गिक संख्या वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world