सौरभ वाघमारे, सोलापूर
सोलापुरातील मोहोळ तालुक्यात सालगड्यानेच मालकाची सोन्याच्या लालसेपोटी हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. सोन्याचे लोभासाठी मालकाचा अपहरणाचा बनाव करून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघडीस आला आहे. मोहोळ तालुक्यातील यल्लमवाडी गावात सदर घटना घडली आहे. मालक कृष्णा नारायण चामे यांची त्यांच्या सालगड्यांनी डोक्यात हातोडा मारून शरीराचे तुकडे करून शेतातील शौचालयाच्या खड्ड्यात पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सालगडी सचिन गिरी याला अटक केली आहे. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 डिसेंबर रोजी कृष्णा चामे यांचं अपहरण केल्याची तक्रार मोहोळ पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. सालगडी सचिन गिरी याने अपहरणाची माहिती दिली होती. अज्ञात पाच ते सहा व्यक्तींनी मालक कृष्णा चामे यांना मोटरसायकलवर बसून अपहरण करून गेल्याची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवल्यानंतर सदर शेतामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्यामुळे पोलिसांना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे तपास पुढे जाऊ शकत नव्हता.
(नक्की वाचा- मदतीसाठी ते ओरडत राहिले, ट्रकचालक थांबला नाही; 36 सेकंदांचा थरकाप उडवणारा VIDEO)
पोलिसांनी वेगवेगळ्या युक्ती लावून तपास सुरू केला. अपहरणाच्या पाच दिवसानंतर सालगडी सचिन गिरी याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याच्या बोलण्यात विसंगती दिसून आली. सचिन गिरी याला ताब्यात घेऊन पोलिसांनी सखोल चौकशी केली असताना गुन्ह्याची कबुली दिली. गिरी याने चामे यांचा आर्थिक आणि सोन्याच्या लोभासाठी हत्या केल्याचं सांगितलं.
(नक्की वाचा- 1 जानेवारीपासून Whatsapp 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, लिस्टच आली समोर)
कृष्णा चामे यांची डोक्यात हातोडा घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर धारदार शस्त्राने त्यांच्या शरीराचे तुकडे करून वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून शेतातील शौचालयाच्या शोष खड्ड्यात पुरले. त्यानंतर कृष्णा चामे यांच्या अंगावरील 18 ते 19 तोळे सोने घेतले. त्यात अंगठ्या, लॉकेट आणि सोन्याच्या कड्यांचा समावेश होता. सदरचे दागिने घरासमोर पुरल्याचे कबुली देखील सचिन गिरी याने दिली. सचिन गिरी याने कृष्णा चामे यांची हत्या एकट्यानेच केल्याची कबुली दिली आहे. मात्र त्यात इतरही सह आरोपी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत.