योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Crime News : अकोला शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. खदान पोलीस स्टेशन हद्दीतील मलकापूर परिसर चोरट्यांच्या टार्गेटवर असल्याचं चित्र आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांत या भागात लाखो रुपयांच्या चोरीच्या घटना झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.दिवसेंदिवस वाढणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे,रात्रीच्या वेळी बंद घरं आणि अपार्टमेंट्स चोरट्यांच्या टार्गेटवर असल्याचं समोर आलंय.
सतर्क नागरिकामुळे चोरीचा प्रयत्न फसला
दरम्यान,काल चोरट्यांनी एका अपार्टमेंटमधून दुचाकी चोरी करण्याचा प्रयत्न केला.मात्र, परिसरातील सतर्क नागरिकांनी वेळीच धाव घेतल्यामुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला.हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांकडून त्याआधारे तपास सुरू करण्यात आला आहे. दुसरीकडे,याच परिसरातील आकृती नगरमध्ये घरफोडीची मोठी घटना समोर आली असून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीसोबतच संतापही वाढताना दिसत आहे.
नक्की वाचा >> CCTV Video : छत्रपती संभाजी नगरमध्ये नागरिकांची झोप उडाली, रात्रीच्या त्या व्हिडीओमुळे लोक भयभीत, काय घडलं?
पोलिसांकडून कारवाईची मागणी,नागरिकांची अपेक्षा वाढली
गेल्या दोन ते तीन महिन्यापासून या परिसरात लाखो रुपयांच्या चोरी होत असून बंद घराचा फायदा घेत चोरटे चोऱ्या करत आहेत. त्यामुळे वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नगरसेवक पराग गवई यांनी पोलिस प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. तसेच लोकांनी घराबाहेर कामानिमित्त बाहेरगावी जात असताना पोलिसांना याबाबतची माहिती द्यावी.
नक्की वाचा >> Nashik News: नाशिक ZP मध्ये खळबळ! महिला अधिकारी ACB च्या जाळ्यात, मोठ्या प्रकरणात लाच घेताना रंगेहाथ पकडलं
पोलिसांनी विशेषतः रात्रीची गस्त वाढवावी,तसेच मलकापूर परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारावी,अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांनीही पोलिसांना अधिक सतर्क राहून त्वरीत कारवाई करावी,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सध्या तरी या वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक भयभीत असून प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world