सलमान खान फायरींग प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी अनुज थापन याने पोलीस कोठडीत आत्महत्या केली. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या आत्महत्येबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून ते वादाच्या भोवऱ्यात सापडल्याची स्थिती आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर 14 एप्रिलला फायरींग झाली होती. या प्रकरणी अनुज खापन याला अटक करण्यात आली होती. फायरींग करणाऱ्या दोघांना शस्त्र पुरवण्याचा आरोप त्याचावर होता. त्याला मुंबईच्या क्राईम ब्रँचने अटक केली होती. त्याला मुंबई क्राईम ब्रँचच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. तिथेच शौचालयात त्याने चादरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
हेही वाचा - सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपी अनुज थापनचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू
अनुज याच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. आरोपीचा वकील अमित मिश्रा आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ता आनंद दुबे यांनी याबाबत शंका उपस्थित केली आहे. ऐवढ्या सुरक्षित लॉकअपमध्ये आत्महत्या होते कशी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय त्याचा चौकशी दरम्यान मोठ्या प्रमाणात त्रास दिला गेला. ते सहन न झाल्याने त्याने आत्महत्या केली का? असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे. मात्र अनुज चौकशी दरम्यान सहकार्य करत होता. त्यामुळे त्याला टॉर्चर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत सत्य काय आहे हा प्रश्न अनुत्तरीत रहातो.
आता या प्रकरणाची चौकशी सीआयडी करत आहे. त्यांनाही सीसीटीव्ही मध्ये काही चुकीची गोष्टी सापडलेली नाही. आता डॉक्टरांच्या पथका द्वारे अनुजचे शवविच्छेदन केले जाणार आहे. त्याचा व्हिडीओ शुटही केला जाईल. त्यानंतरच पुढची चौकशी होईल. दरम्यान आझाद मैदान पोलीस स्थानकात याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अनुजच्या आत्महत्येनं उपस्थित झालेले 5 प्रश्न
1) 23 वर्षाचा अनुज थापनला क्राईम ब्रँचच्या सर्वात सुरक्षित लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. तरीही त्याने आत्महत्या कशी केली?
2) अनुज थापनला ज्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते तिथे आणखी 6 कैदी होते. सीसीटीव्ही तिथे होते. शिवाय 4 पोलीस सुरक्षेसाठी होते. असे असतानाही अनुजवर त्यांची नजर कशी नव्हती?
3) अनुज थापनच्या सहाय्याने पोलीस लॉरेंस विश्नोई आणि अनमोल विश्नोई पर्यंत पोहचण्याच्या तयारीत होते. त्यासाठी अनुज हा महत्वाचा दुवा होता. त्याचा मृत्यू झाल्याने आता पोलीस काय करणार?
4) मकोका लागल्याने अनुजला लवकर जामीन मिळाला नसता. त्यामुळे त्याने हताश होऊन आत्महत्या केली असे बोलले जाते. पण अनुज हा सधासुधा आरोपी नव्हता. तो या जगतात मुरलेला खेळाडू होता. त्याच्यावर याआधीच तीन जबर गुन्हे दाखल होते. अशा स्थितीत शिक्षेच्या भितीने को आत्महत्या कशाला करेल?
5) मुळचा पंजाबचा असलेल्या अनुज आत्महत्या करूच शकत नाही असा दावा त्याच्या कुटुंबाने केला आहे. उलट त्याची हत्या केली असल्याचा आरोप कुटुंबाकडून केला जातोय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world