रिझवान शेख, प्रतिनिधी
Mumbra News : महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे महानगरपालिकेतील मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक ३१ मधील अजित पवार गटाच्या उमेदवार मनीषा प्रवीण पवार यांचे पती प्रवीण पवार यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंब्रा येथील सम्राट नगर येथे प्रवीण पवार यांच्यावर विरोधकांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत प्रवीण पवार यांच्या पत्नी मनीषा पवार यांनी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवली होती. त्या शरद पवार गटाच्या उमेदवार पल्लवी शिवा जगताप यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र या निवडणुकीत मनीषा पवार यांचा पराभव झाला. विजयानंतर प्रवीण पवार आणि शिवा जगताप यांच्यात अनेक वेळा वाद झाले आहेत.
प्रवीण पवार यांचा धक्कादायक आरोप...
प्रवीण पवार यांनी आरोप केला की शिवा जगताप यांचे भाऊ अप्पा जगताप यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी हल्ला करून पळ काढला आहे. या हल्ल्यात प्रवीण पवार यांच्या मानेवर आणि चेहऱ्यावर वार करण्यात आले. प्रवीण पवार तक्रार देण्यासाठी मुंब्रा पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान मुंब्रा पोलीस ठाण्यात राजकीय पक्षाच्या अधिकाऱ्यांची गर्दी सुरू झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world