योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola Thief Video Viral : अकोला शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून खदान पोलीस स्टेशन हद्दीतील मलकापूर परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या भागात घरफोडी, दुचाकी चोरी आणि संशयास्पद हालचालींच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच 18 तारखेला एका अपार्टमेंटमधून दुचाकी चोरीचा प्रयत्न झाला होता. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न अयशस्वी ठरला. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते, ज्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
सीसीटीव्हीत संशयितांची हालचाल, चाकू दाखवत पळून जाण्याचा प्रयत्न
दरम्यान आज आरोग्यधाम कॉलनी परिसरात दोन संशयित व्यक्ती चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. ही बाब लक्षात येताच परिसरातील काही नागरिकांनी तात्काळ त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र स्वतःला अडवले जात असल्याचे पाहून त्या संशयितांनी चाकू काढून नागरिकांवर हल्ल्याचा प्रयत्न करत तेथून पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र धाडस दाखवत नागरिकांनी त्यांचा पाठलाग सुरू ठेवला.