Instagram वर ओळख झालेल्या तरुणावर प्रेम जडले, असे काय घडले की तरुणीने आत्महत्या केली ?

चित्रपटाची कथा वाटेल अशा घटना या तरुणीच्या आयुष्यात घडल्या होत्या. या घटनांचा जबर मानसिक धक्का बसल्याने या तरुणीने टोकाचे पाऊल उचलले.

जाहिरात
Read Time: 2 mins
सातारा:

साताऱ्यातील वाठार पोलीस ठाण्यात एका तरुणीच्या आत्महत्येचा तपास करत असताना पोलिसांना धक्कादायक बाबी समजल्या. चौकशी दरम्यान त्यांना जे कळाले ते धक्कादायक होते. चित्रपटाची कथा वाटेल अशा घटना या तरुणीच्या आयुष्यात घडल्या होत्या. या घटनांचा जबर मानसिक धक्का बसल्याने या तरुणीने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेमुळे इन्स्टाग्राम किंवा तत्सम सोशल मीडिया मंचावर बोलताना जडणारे प्रेम हे किती नकली आणि धोकादायक असते हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. 

हे ही वाचा: यशश्रीनंतर आणखी एकीचा बळी, विरोध केला म्हणून 14 वर्षीय मुलीसोबत भयंकर घडलं

मेधा(बदललेले नाव) ही वाठार स्टेशन परिसरात राहात होती. इन्स्टाग्रामवर तिची ओळख मनीष नावाच्या तरुणाशी झाली. मात्र तिला पुसटशीही कल्पना नव्हती की या मनीषमुळे तिच्या आयुष्यात  वादळ येणार आहे. मनीष आणि मेधाची इन्स्टाग्रामवर गप्पागोष्टींना सुरुवात झाली. हळूहळू मेधा ही मनीषच्या प्रेमात पडली. इथून खऱ्या अर्थाने नाट्यमय घडामोडींना सुरुवात झाली. मेधाने मनीषला भेटण्यासाठी हट्ट करायला सुरुवात केली. 

Advertisement

हे ही वाचा: नवी मुंबईच्या बड्या राजकीय नेत्याला ब्लॅकमेल करण्यासाठी महिलेचा वापर! मुंबईतील वकिलाला अटक

मेधाला अचानक एके दिवशी शिवम पाटील नावाच्या व्यक्तीचा इन्स्टाग्रामवर मेसेज आला. आपण मनीषचे वडील असून मनीषचा मृत्यू झाल्याचे शिवम पाटील या व्यक्तीने मेधाला सांगितले. मेधाला काही फोटो पाठवण्यात आले, ज्यात दवाखान्यामध्ये एक व्यक्ती मृतावस्थेत असल्याचे दाखवण्यात आले होते. याचा धक्का बसल्याने मेधा वेडीपिशी झाली होती. मनीषच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मेधाला मनीषच्या मृत्यूचा मानसिक धक्का बसला होता. काय करायचे हे सुचेनासे झालेल्या मेधाने 12 जुलै रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

Advertisement

हे ही वाचा:लोणावळ्यातील विद्यार्थ्यांच्या दुहेरी हत्या प्रकरणाचा 7 वर्षांनी निकाल, आरोपीची निर्दोष मुक्तता! 

सदर प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. काहीतरी गडबड असल्याचे जाणवल्याने सायबर पोलिसांनाही बोलावण्यात आले. पोलिसांनी मेधाचा मोबाईल तपासला असता त्यांना इन्स्टाग्रामवरील मनीष आणि शिवम पाटील यांच्यातील संभाषण दिसले. याचा अधिक तपास केला असता पोलिसांना कळाले की मनीष आणि शिवम पाटील या दोन्ही एकच व्यक्ती होत्या. त्याहूनही धक्कादायक बाब ही होती की या दोन्ही व्यक्ती बनावट होत्या. प्रत्यक्षात मेधाची मैत्रीणच खोट्या नावाने मेधाशी बोलत होती. मेधा ही मनीष या बनावट व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचे कळाल्यानंतर तिची मैत्रीण घाबरली होती. त्यामुळे तिनी मनीष मेल्याचा बनाव केला. त्यामुळे गुंतागुंत आणखी वाढली आणि मेधाने आत्महत्या केली. मेधाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्या मैत्रिणीला अटक केली आहे. मस्करी कशी अंगाशी येते त्याची ही घटना उत्तम उदाहरण आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उप अधीक्षक सोनाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने, उपनिरीक्षक सातव, भोसले, पोलिस कर्मचारी चव्हाण, देशमुख, इथापे यांच्यासह सातारा सायबर टीमने या गुन्ह्याची उकल केली. 
 

Advertisement
Topics mentioned in this article