जाहिरात

प्रशिक्षणार्थी महिला अधिकाऱ्याचा विनयभंग,नेत्याविरोधात गुन्हा दाखल

ज्या महिला अधिकाऱ्यासोबत हा प्रसंग घडला आहे ती सोमवारी सेवेत रुजू झाली होती आणि मंगळवारी तिच्यासोबत हा प्रसंग घडला. 

प्रशिक्षणार्थी महिला अधिकाऱ्याचा विनयभंग,नेत्याविरोधात गुन्हा दाखल
जालना:

लक्ष्मण सोळुंके

महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.  विकृत नराधमांची मजल आता महिला अधिकाऱ्यांचा विनयभंग करण्यापर्यंत पोहोचली आहे. जालन्यामध्ये महिला मुख्याधिकाऱ्याचा विनयभंग करण्यात आला आहे. आरोपी हा एका राजकीय पक्षाचा स्थानिक नेता आहे. धक्कादायक बाब ही आहे की हा प्रकार शासकीय विश्रामगृहात घडला आहे. ज्या महिला अधिकाऱ्यासोबत हा प्रसंग घडला आहे ती सोमवारी सेवेत रुजू झाली होती आणि मंगळवारी तिच्यासोबत हा प्रसंग घडला. 

हे ही वाचा : बदलापूर पुन्हा हादरलं! चिमुरडी पुन्हा एकदा ठरली बळी, सख्ख्या नात्याने गाठली क्रौर्याची परिसीमा!

जालना जिल्ह्यातील मंठा शहर नगर पंचयातमध्ये प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी म्हणून सोमवारी रोजी एक 38 वर्षीय महिला अधिकारी रुजू झाली होती. नुकतीच रुजू झाल्यामुळे तिची तात्पुरती निवासव्यवस्था मंठा शहरातील शासकीय विश्रामगृहातील एका खोलीत करण्यात आलेली होती.  मंगळवारी ही महिला अधिकारी विश्रामगृहात असताना दोन माणसे तिच्या खोलीत घुसली होती. ही दोघेही दारू पिऊन आली होती असं पोलीस तक्रारीत म्हटले आहे. खोलीत घुसल्यानंतर या दोघांनी 'आम्हाला तुमचे सहकार्य हवे आहे असं म्हणत बरळण्यास सुरुवात केली.' या महिला अधिकाऱ्याने या दोघांना हाकलून देण्याचा प्रयत्न केला असता या दोघांनी त्यांचा विनयभंग केला. या दोघांनी आपल्याला शिवीगाळही केल्याचे  अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

हे ही वाचा : पुण्यात महिलेची निर्घृणपणे हत्या; डोकं, पाय, हात कापून मुठा नदीपात्रात फेकलं

या अधिकाऱ्याने घडला प्रकार जालना इथे पोहचत जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि अप्पर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांच्या कानावर घातला. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्याशी संपर्क साधून गुन्हा नोंदवण्यास सांगितले. त्यानुसार, कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपासासाठी हे प्रकरण मंठा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com