Yavatmal News : यवतमाळच्या नेर तालुक्यातील आजंती पारधी बेड्यावर राहणाऱ्या चिमुकली अन्वी हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता गंभीर वळण घेतलं आहे. १ मे रोजी अचानक चक्कर येऊन तिचा मृत्यू झाल्यानंतर कोणताही वैद्यकीय तपास न करता मृतदेह घाईघाईने पुरण्यात आल्याने परिसरात संशयाचे वातावरण निर्माण झालं होतं. अखेर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुरलेला मृतदेह बाहेर काढून घटनास्थळीच शवविच्छेदन केले. या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
स्मशानभूमीतून मृतदेह बाहेर काढला...
स्थानिक नागरिकांनी अन्वीचा मृत्यू उष्माघातामुळे किंवा तीव्र पाणीटंचाईमुळे झाल्याचा आरोप केला आहे. आजंती पारधी बेड्यावर अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा नसल्याचे नागरिकांचे म्हणणे असून प्रखर उन्हामुळे व पाण्याअभावी चिमुकलीची प्रकृती बिघडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अन्वीच्या मृत्यूमागील नेमकं कारण शोधण्यासाठी आज सकाळी आठ वाजता प्रशासन, फॉरेन्सिक टीम आणि आरोग्य विभागाच्या उपस्थितीत स्मशानभूमीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर जागेवरच शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली. संपूर्ण कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.
दरम्यान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशिक भोयर यांनी सांगितले की, “अन्वी घोसले हिच्या मृत्यूचे नेमके कारण फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होईल. शवविच्छेदनाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.” दरम्यान, अन्वीच्या मृत्यूमागे उष्माघात, पाण्याअभावी झालेली शारीरिक स्थिती की अन्य काही कारण, याबाबत आता उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. फॉरेन्सिक अहवालानंतरच या गूढ मृत्यूमागचे सत्य समोर येणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world