अकोला लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. येथून वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मराठा समाजाचं प्राबल्य असलेल्या या जिल्ह्यात 2019 च्या निवडणुकीत संजय धोत्रे निवडून आले होते. यंदा संजय धोत्रे यांचा सुपूत्र अनुप धोत्रे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यंदा दोन मराठा उमेदवार आणि एक दलित चेहरा असं चित्र या मतदारसंघात आहे. 1989 साली इथून सर्वप्रथम भाजपाचे पांडुरंग फुंडकर विजयी झाले. तेव्हापासून 9 पैकी 7 वेळा अकोल्यात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे. पांडुरंग फुंडकर यांनी 3 वेळा तर संजय धोत्रे यांनी 4 वेळा अकोलाकरांचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलंय.
मतदारसंघाविषयी...
मराठा प्राबल्य असलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात साडे पाच लाख कुणबी-मराठा मतदार आहेत. अडीच लाखांच्या जवळपास मुस्लीम मतं तर अडीच लाखांपर्यंत दलित मतं आहेत. याशिवाय अन्यमध्ये हिंदी भाषिक, माळी, बारा बलुतेदार, ओबीसी मिळून 18 लाख मतदार आहेत. या भागात सर्वाधिक मराठा समाज असल्याने मराठ्याचं प्रतिनिधित्व करणारा जिल्हा मानला जातो. त्यामुळे येथे मराठा मतदार निर्णायक राहिला आहे.
भाजपअंतर्गत धुसफूस...
अकोल्यातून चार टर्म खासदार म्हणून निवडून आलेले संजय धोत्रे यांचा मुलगा अनुप धोत्रे यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे भाजपअंतर्गत नाराजी वाढली आहे. अनेक इच्छूक नेत्यांना यामुळे एक पाऊल मागे जावे लागले. त्यामुळे यंदा अकोल्यात घराणेशाही मुद्द्यावरुन विरोधकांनी रान उठवलं होतं. त्याशिवाय भाजप चार टर्म खासदार असल्याने या भागात सत्ताविरोधी वातावरण निर्माण झालं आहे. काँग्रेसकडून अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक अधिक कठीण झाली. येथील बाळापूर मतदारसंघाचे माजी आमदार नारायण गव्हाणकर, भाजप नेते रणजीत पाटील देखील विरोधात असल्याची चर्चा होती.
भाजपच्या जमेच्या बाजूचा विचार केला तर 1989 साली रामजन्मभूमी आंदोलनाला सुरुवात झाली. त्यावेळी अकोल्यात भाजपानं पहिल्यांदा निवडणूक जिंकली. आता अयोध्येतील रामजन्मभूमीच्या ठिकाणी भव्य मंदिर झाल्यानंतर ही पहिली लोकसभा निवडणूक आहे. अकोल्यातील हिंदुत्ववादी मतदार आपल्याला साथ देईल हा भाजपाला विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा आणि तळागळापर्यंत असलेलं रा.स्व. संघ आणि भाजपा कार्यकर्त्यांचं नेटवर्क ही देखील धोत्रे यांची जमेची बाजू आहे. त्याचबरोबर तिरंगी लढतीमुळेही त्यांचा मार्ग काहीसा सोपा झालाय.
घराणेशाही की विकास...
अकोल्यातील अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत. येथील तीनशे गावात खारपानपट्ट्याचा प्रश्न, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, एमआयडीसीतील समस्या यांसारख्ये अनेक प्रश्न सोडविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मतदार सत्ताधाऱ्यांविरोधात जाऊ शकतो. इतर मतदारसंघाच्या तुलनेत स्थानिक मुद्दे प्रभावी ठरले. काँग्रेसकडून चांगली प्रतिमा असलेला उमेदवार दिल्याने काँग्रेसकडून चांगलं संघटन बांधण्यात आलं होतं.
दोन नवखे आणि एक सतत निवडणूक लढवणारा उमेदवार, अशी त्रिकोणी लढत अकोल्यात पाहायला मिळाली. यंदा प्रकाश आंबेडकर यांनीही येथे चांगला प्रचार केला. अंजलीताई आंबेडकर, सुजार आंबेडकर हिरहिरीने सामील झाल्या होत्या. सोशल मीडियावरही त्यांनी व्यापक प्रचार केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे ही लढत नेक टू नेक ठरली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अभय पाटील यांच्यामुळे मराठा मतदानात विभाजन होऊ शकतं.
येथे सायलेंट वोटर आणि महिला फॅक्टर परिणामकारक ठरू शकता असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. येथे शिवसेनेचं प्राबल्य प्रभावी असल्याने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणारी मतं अभय पाटलांच्या पारड्यात पडू शकतात. अकोल्यात यंदा मतदानात 1.73 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अकोल्यात गेल्या वेळी 60.06 टक्के मतदान झालं होतं. यंदा 61.79 टक्के मतदान झालं. मतदान वाढतं तेव्हा परिवर्तनाचा संकेत मानला जातो. त्यामुळे अकोल्यात परिवर्तन होणार का? हे लवकरच स्पष्ट होईल. येथे अल्पसंख्याक मतांचंही प्रमाण जास्त आहे. त्यामुळे येथील काही मतं वंचितकडे वळण्याची शक्यता आहे. यासाठी प्रकाश आंबेडकरांचं सोशल इंजिनियरिंग कारणीभूत ठरू शकतं. कारण यावेळी त्यांनी मुस्लीम मतदारांनाही आवाहन केलं. विशेष म्हणजे एमआयएमच्या उमेदवाराला येथून चाळीस हजार मतं मिळाली होती. त्यामुळे ही मतं वंचितकडे जाऊ शकतात.
अकोल्यातील विधानसभा मतदारसंघ
रिसोड - काँग्रेसचे अमित झनक येथील विद्यमान आमदार आहेत. गेल्या टर्ममध्ये काँग्रेसला ६० टक्के मतदान झालं होतं. यंदा हा आकडा ६२.४३ पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे हे वाढलेलं मतदान अभय पाटील यांना मिळू शकतं.
बाळापूर - या विधानसभा मतदारसंघातून उद्धव सेनेचे नितीन देशमुख आमदार आहेत. या आधीच्या निवडणुकीत येथे 62.43 टक्के मतदान झालं होतं. यंदा हा आकडा 66.58 पर्यंत पोहोचला असून साडे चार टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. हा वाढलेला टक्का कोणाच्या पारड्यात असा प्रश्न आहे. नितीन देशमुख यांनी निवडणुकीपूर्वी खारपानपट्ट्याच्या पाण्याचा प्रश्न घेऊन पायी वारी काढली होती. येथील क्रियाशीलता पाहता सेनेच्या माध्यमातून मताधिक्य मिळू शकतं.
मूर्तीजापूर - भाजपचे हरीश पिंपळे येथील विद्यमान आमदार आहेत. यापूर्वी येथे ६१ टक्के आणि आता ६४.५२ टक्के मतदान झालं आहे. साडे तीन टक्क्यांनी मतदान वाढलं आहे.
अकोट - येथून भाजपचे प्रकाश भारसाकळे विद्यमान आमदार आहेत. गेल्या वेळी ६३ टक्के आता ६४.०२ टक्के मतदान पार पडलं. गेल्या वेळी लोकसभेत भाजपला ५० हजाराचा लीड मिळाला होता. मुख्यत्वे अकोला आणि अकोटला जोडणारा पूल पडला त्यानंतर नवा पुल बांधला. परंतू तो पहिल्याच पावसात तुटला. त्यानंतर नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. त्यामुळे या भागात अनुप धोत्रे आणि अभय पाटील यांच्यात मतांचं विभाजन झालं असावं, असं राजकीय तज्ज्ञ सांगतात.
अकोला पूर्व - रणधीर सावरकर येथून भाजपचे आमदार आहे. आधी येथे ५८ टक्के आणि आता ५९ टक्के मतदान झालं आहे. यंदा मतदानात १.३६ टक्के वाढ झाली आहे. या भागातून भाजपचे अनुप धोत्रे यांना लीड मिळू शकतं. या विधानसभेतून गेल्या वेळी वंचित द्वितीय क्रमांकावर होते. शहरी मतदारांचा विचार करता सोशल इंजिनियरिंगचा परिणाम होऊ शकतो आणि काही पारंपरिक मतं काँग्रेसकडे वळू शकतात.
अकोला पश्चिम - गोवर्धन शर्मा येथील विद्यमान आमदार आहेत. आधी येथून 51.73 टक्के आणि आता 54.88 टक्के मतदान झालं. यात 3.15 टक्के वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. अकोल्यातील सर्व सहा विधानसभामध्ये अकोला पश्चिम येथे सर्वात कमी मतदान झालं.
2019 चा निकाल
संजय धोत्रे - 5,45,444 - 49.53 टक्के
प्रकाश आंबेडकर - 2,78,848 - 24.91 टक्के
हिदायत पटेल - 2,54,370 - 22.72 टक्के
गेल्या टर्मचा निकाल पाहिला तर अकोल्यातून विजय मिळविण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या उमेदवाराला तीन ते साडे तीन लाख मतं अधिक मिळवावी लागतील. काँग्रेसह वंचितसाठीही अस्तित्वाची लढाई निर्माण झाली असल्याने सर्वच उमेदवारांनी जोर लावला आहे. प्रत्यक्षात या जागेतून कोण बाजू मारणार हे निकालानंतर समोर येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world