महाराष्ट्रात झालेल्या भाजपाच्या पराभवाची जबाबदारी स्विकारुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. 'मला जबाबदारीतून मोकळं करण्याची विनंती फडणवीस यांनी केली होती.' फडणवीस यांच्या या विनंतीला भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी उत्तर दिलंय. शाह यांनी फडणवीस यांना राजीनामा न देण्याची सूचना केलीय.
काय म्हणाले अमित शाह?
फडणवीस यांनी राज्य सरकारमधील काम सुरु ठेवावं, अशी सूचना अमित शाह यांनी केलीय. तुम्ही राजीनामा दिला तर त्याचा भाजपा कार्यकर्त्यांच्या मनोधैर्यावर परिणान होईल. आपण शपथविधीच्या कार्यक्रमानंतर या विषयावर सविस्तर चर्चा करु, असं सांगत अमित शाह यांनी फडणवीस यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात भाजपासाठी काय करता येईल, याची योजना तयार करा आणि त्यावर काम सुरु करा अशी सूचना देखील शाह यांनी फडणवीस यांना केली आहे.
( नक्की वाचा : 'मला सरकारमधून मोकळं करावं', देवेंद्र फडणवीस यांची मागणी )
फडणवीस यांचा काय होता प्रस्ताव?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत 'मला सरकारमधून मोकळं करावं' असं आवाहन केलं होतं. 'या निवडणुकीचे नेतृत्व भाजपमध्ये मी करत होतो त्यामुळे जागा कमी झाल्याची जबाबदारी मी स्वीकारतो. मी स्वत: कमी पडलो आहे. ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करेन. भाजपला जो धक्का बसला त्याची जबाबदारी मी देवेंद्र फडणवीस घेत आहे. मी पक्षाला विनंती करणार आहे की आता मला विधानसभेसाठी पूर्णवेळ उतरायचे आहे त्यामुळे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करत आहे की मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी,' अशी मागणी फडणवीस यांनी केली होती.
( नक्की वाचा : महाराष्ट्रातल्या भाजपाच्या पराभवाची 5 मोठी कारणं काय आहेत? )
महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महायुतीचं सरकार आहे. महायुतीमध्ये भाजपा मोठा पक्ष आहे.एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्यात देवेंद्र फडणवीस सुरुवातीला तयार नव्हते. त्यांनी त्याबाबत तसं जाहीर देखील केलं होतं. पण पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर ते उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले. सध्या फडणवीस यांच्याकडं उपमुख्यमंत्रीपदासह गृहमंत्रीपद देखील आहे.