25 वर्षे शिवसेनेचा उमेदवार असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून महिला उमेदवार कधी पराभूत झाली नसल्याचा इतिहास आहे. काँग्रेसने 1980 मध्ये उषा चौधरी यांना अमरावतीच्या लोकसभा जागेवरुन मैदानात उतरवलं होतं. यावेळी त्या विजयी झाल्या होत्या. यानंतर 1991 मध्ये प्रतिभा पाटीलदेखील काँग्रेसच्या तिकीटावर उभ्या राहिल्या होत्या, त्यांनी शिवसेनेचे प्रकाश पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार नवनीत राणा विजयी झाल्या होत्या. मात्र पुढील काही महिन्यात त्या भाजपमध्ये सामील झाल्या.
यंदा काँग्रेसकडून बळवंत वानखडे तर बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून दिनेश बूब यांच्यात लढत आहे. तर अगदी शेवटच्या टप्प्यात भाजपकडून नवनीत राणा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नवनीत राणा आणि रवी राणा दाम्पत्य वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे राज्यभरात कायम चर्चेत राहिले आहेत. कधी हनुमान चालिसा, तर कधी मोदींविरोधातील वक्तव्य तर अनेकदा विरोधकांवर केलेल्या खालच्या पातळीवरील कमेंटमुळे त्यांच्यावर वेगवेगळ्या पातळीवरून टीका केली जाते. आतापर्यंत काँग्रेसच्या बाजूने असलेला विदर्भ यंदा काँग्रेसला साथ देणार की, पुन्हा नवनीत राणांच्या बाजूने कौल जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अमरावतीमध्ये मतदानाचा मुद्दा काय होता?
अमरावतीत शेतकरी आत्महत्या, कापूस उत्पादकांचे प्रश्न, प्रकल्पग्रस्तांचा मुद्दा, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, कंत्राटीकरण, मेळघाटातील कुपोषण यांसारखे अनेक गंभीर प्रश्न समोर आहेत. प्रत्यक्षात हे मुद्दे निवडणुकीत चर्चिले गेले नाही. तर भाजपकडून हिंदुत्वच्या मुद्द्यावर प्रचार करण्यात आला. दुसरीकडे बळवंत वानखडे यांनी जिंकून आल्यानंतर काय काय करणार याची एक यादीच जाहीर केली. मात्र मूळ प्रश्न सोडविण्यासाठी विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी काम केलं नसल्याचा आरोप अमरावतीकरांकडून केला जात आहे. देवापेक्षा माणसांवर खर्च करायला हवा. देवपूजा घरी करतो ते सार्वजनिक पातळीवर दाखवण्याची गरज नाही, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात होती.
तिन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार...
अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपसह काँग्रेसनेही जोरदार प्रचार केला. नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमरावतीत आले होते. याशिवाय देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांचाही अमरावतीत दौरा झाला. दुसरीकडे बळवंत वानखडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी अमरावतीत दाखल झाले होते. प्रहार जनशक्ती पक्षाचे दिनेश बूब यांच्या प्रचारासाठी बच्चू कडू यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. शेवटच्या टप्प्यात त्यांची सभा रद्द करून ते मैदान भाजपला दिल्या कारणाने त्यांनी राडा घातला होता.
बच्चू कडूंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह...
एकनाथ शिंदेंचा हात धरून गुवाहाटीला जाणाऱ्या बच्चू कडूंनी महायुतीचे उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात शड्डू ठोकत प्रहार जनशक्तीचा उमेदवार रिंगणात उतरवला. त्यांच्या या भूमिकेवरुन अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. जिंकून येण्यासाठी की कोणाला पाडण्यासाठी बच्चू कडूंनी उमेदवार उभा केला, हा प्रश्न राजकीय तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. बच्चू कडू यांनी उभ्या केलेल्या उमेदवारामुळे काँग्रेसला फटका बसू शकतो. निवडणूक त्रिकोणी केल्याशिवाय भाजपचा उमेदवार जिंकून येत नाही, अशा अनेक प्रकरणानंतर अमरावतीतही असा प्रयोग झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या निवडणुकीत वंचितचा उमेदवार उभा केल्यामुळे ज्याप्रकारे काँग्रेसची मतं विभागली गेली, त्यानुसार अमरावतीतही दिनेश बूब यांच्यामुळे बळवंत वानखडे यांच्या मतांवर परिणाम होईल.
जातीय मतांचं काय?
अमरावती लोकसभा मतदारसंघात मुस्लीम, आदिवासी आणि दलित मतं निर्णायक ठरतात. त्याशिवाय मराठा मतदारही मोठ्या प्रमाणात आहे. आतापर्यंतच्या इतिहासानुसार, दलित आणि मुस्लिमांचं एकगठ्ठा मतदान काँग्रेसच्या पारड्यात पडतं. हा मतदारसंघ दलितांसाठी राखीव आहे. मात्र जरी काँग्रेसला दलितांचं एकगठ्ठा मतदान होत आलं तरीही दलित असलेले दिनेश बूब यांच्यामुळे मतांची विभागणी होऊ शकते. दुसरीकडे अमरावतीच्या 20 लाख मतदारांपैकी हिंदूंचा आकडा निम्म्याहून अधिक आहे. त्यामुळे हे मतदान भाजपला जाईल. दुसरीकडे येथील मराठा मतदान वानखडेंकडे वळू शकतं असा अंदाज आहे. अमरावतीत यंदा 63.67 टक्के मतदान झालं. 2019 मध्ये 63.08 टक्के मतदान झालं होतं. वाढलेलं मतदान कोणाच्या बाजूने जाणार हा प्रश्न आहे. या निवडणुकत देशभरात मोदींची लाट असतानाही अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या नवनीत राणा या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. दलित, मुस्लीम आणि आदिवासी मतांचा त्यांना फायदा झाला होता, असं जाणकारांचं म्हणणं आहे.
राणा दाम्पत्याचं मॅचिक चालणार?
नवनीत राणा यांनी गेल्या पाच वर्षात विकासाच्या कामापेक्षा हनुमान चालिसाचं आयोजन, शेतात पेरणीचा कार्यक्रम, किराणा वाटप अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं. याशिवाय मतदारसंघातील छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना ते आवर्जुन हजेरी लावतात. त्यामुळे या मतदारसंघात राणा दाम्पत्याचा जनसंपर्क चांगला आहे. अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळेही राणा दाम्पत्य राज्यभरात चर्चेत राहिले आहेत. 2019 मध्ये मोदींच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या नवनीत राणा यांनी आपली भूमिका बदलली आणि मोदींचा गवगवा सुरू केला. परिणामी नवनीत राणा यांच्याविरोधात वातावरण गेले. त्यामुळे भाजपमधील नेतेसुद्धा नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज होते. राणा दाम्पत्यांच्या राजकीय खेळीमुळे नैतिकतेचा मुद्दाही उपस्थित केला जात होता. सिनेसृष्टी ते खासदार असा प्रवास करताना त्यांच्यावर अनेकवेळा टीका करण्यात आली. मात्र नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा वरदहस्त असल्यामुळे त्यांना यंदाही तिकीट मिळालं.
अमरावती जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील मेळघाट आणि अचलपूर हा निर्णायक विधानसभा मतदारसंघ आहे.
क्रमांक | विधानसभा मतदारसंघ | आमदार | पक्ष |
1 | धामणगाव रेल्वे | प्रतापदादा अडसाद | भाजप |
2 | दर्यापूरवे | बळवंत वानखेडे | काँग्रेस |
3 | बडनेरा | रवी राणा | अपक्ष |
4 | अमरावती | सुलभा खोडके | काँग्रेस |
5 | तिवसा | यशोमती ठाकूर | काँग्रेस |
6 | मेळघाट | राजकुमार पटेल | अपक्ष |
7 | अचलपूर | बच्चू कडू | अपक्ष |
8 | मोर्शी | देवेंद्र भुयर | स्वाभिमानी |