Assam Exit Poll 2026: ईशान्य भारतातील महत्त्वाचे राज्य असलेल्या आसाममध्ये भाजपाचे कमळ पुन्हा एकदा उमलण्याचा अंदाज आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकड्यांनी आसाममध्ये भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) मोठे यश मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आघाडीने काँग्रेसच्या आव्हानाला धुळीस मिळवत सलग तिसऱ्यांदा सत्तेकडे कूच केली आहे. घुसखोरीच्या मुद्द्यावर केंद्रित केलेला भाजपचा प्रचार मतदारांच्या पसंतीस उतरल्याचे या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे.
भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत; काँग्रेसची पिछेहाट
एनडीटीव्ही-ॲक्सिस माय इंडिया (NDTV-Axis My India) च्या एक्झिट पोलनुसार, आसाम विधानसभेच्या एकूण 126 जागांपैकी भाजपा-एजीपी-बीपीएफ आघाडीला 88 ते 100 जागा मिळण्याची शक्यता आहे.
याउलट, एकेकाळी आसामवर वर्चस्व गाजवणाऱ्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला केवळ 24 ते 36 जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, भाजप हा 70 ते 80 जागांसह राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसत आहे.
( नक्की वाचा : Exit Poll 2026: बंगालमध्ये दीदींचा गड कोसळणार की भाजपाचं कमळ फुलणार? पाहा सर्व एक्झिट पोलची आकडेवारी )
एक्झिट पोल काय सांगतात?
आसाममध्ये भाजपचे सरकार पुन्हा येईल, याबाबत सर्वच प्रमुख एक्झिट पोलमध्ये एकवाक्यता दिसत आहे. वेगवेगळ्या संस्थांनी वर्तवलेले अंदाज खालीलप्रमाणे आहेत:
मॅट्रिझ (Matrize): भाजप आघाडीला 85 ते 95 जागा मिळतील, तर काँग्रेस आघाडीला 25 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
जनमत (Janmat): या संस्थेच्या मते भाजप आघाडीला 87 ते 98 जागा, तर काँग्रेसला 29 ते 30 जागा मिळतील.
जेव्हीसी (JVC): या पोलनुसार एनडीएला 88 ते 101 जागा, तर काँग्रेसला 23 ते 33 जागा मिळण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा : Sanjay Raut: ठाकरेंचा राऊतांना 'चेक मेट'! आदित्य ठाकरेंनी निर्णय फिरवला आणि संजय राऊतांचा पत्ता कट झाला? )
मतांची टक्केवारी आणि पक्षनिहाय बलाबल
एनडीटीव्ही-ॲक्सिस माय इंडिया (NDTV-Axis My India) च्या अंदाजानुसार, सत्ताधारी भाजप आघाडीला एकूण 48 टक्के मते मिळू शकतात. यामध्ये भाजपला सर्वाधिक 37 टक्के, एजीपी (AGP) ला 7 टक्के आणि बीपीएफ (BPF) ला 4 टक्के मते मिळतील. काँग्रेस आघाडीला 38 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. भाजप आघाडीत एजीपीला 7 ते 9 आणि बीपीएफला 9 ते 11 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
घुसखोरीचा मुद्दा आणि प्रचाराची रणधुमाळी
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी प्रचारादरम्यान बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढणे आणि आसामी संस्कृती, जमीन व ओळखीचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले होते. भाजपने मांडलेली 'जाती-माती-भेटी'ची भूमिका मतदारांना भावल्याचे दिसते. दुसरीकडे, काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या वैयक्तिक मालमत्तेवर टीका करत त्यांना लक्ष्य केले होते, मात्र एक्झिट पोलचे आकडे पाहता काँग्रेसची ही रणनीती अपयशी ठरल्याचे चित्र आहे.
मतमोजणी आणि निकालाची प्रतीक्षा
आसाम विधानसभेसाठी भाजपाने 90, एजीपीने 26 आणि बीपीएफने 11 जागांवर निवडणूक लढवली होती. तर काँग्रेसने 99 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. एक्झिट पोलचे अंदाज जरी भाजपच्या बाजूने असले, तरी प्रत्यक्ष निकाल 4 मे रोजी जाहीर होणार आहेत. तोपर्यंत आसाममध्ये कोणाचे पारडे जड ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world