- Axis My India च्या एक्झिट पोलनुसार विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाला तामिळनाडूत सर्वाधिक जागा
- अन्य अनेक संस्थांनी स्टॅलिन यांच्या DMK पक्षाला पुन्हा सत्ता मिळेल असा अंदाज वर्तवला आहे
- JVC संस्थेने ADMK+ आघाडीला 128 ते 147 जागांपर्यंत स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला आहे
Axis My India Exit Poll: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये अभिनेता विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्या संस्थांनी एक्झिट पोल केले आहेत त्यात बहुतांश संस्थांनी स्टॅलिन यांच्या DMK ची सत्ता पुन्हा येणार असा अंदाज व्यक्त केला आहे. पण त्या पैकी NDTV Axis My India च्या अंदाजाने सर्वांनाच चकीत केले आहे. Axis My India च्या अंदाजानुसार विजय यांचा पक्ष राज्यात मोठा चमत्कार घडवू शकतो. सर्वाधिक जागा या पक्षाला मिळाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Axis My India च्या सर्वेक्षणानुसार, TVK पक्षाला 98 ते 120 जागा मिळण्याची शक्यता आहे. जर हे आकडे प्रत्यक्ष निकालात बदलले, तर विजय यांचा पक्ष तामिळनाडूच्या राजकारणात सर्वात मोठी शक्ती म्हणून उदयास येईल. मात्र, इतर संस्थांच्या आकडेवारीत भिन्नता पाहायला मिळत आहे. JVC ने ADMK+ आघाडीला 128-147 जागांसह स्पष्ट बहुमताचा अंदाज वर्तवला आहे.
Matrize 122-132 जागा, P-Marq 125-145 जागा आणि Peoples Insight 120-140 जागा या तीन संस्थांनी सत्ताधारी DMK+ आघाडी पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज वर्तवला आहे. दुसरीकडे, 'पीपल्स पल्स'ने देखील DMK+ आघाडीला 125-145 जागा देऊन आघाडीवर ठेवले आहे, तर ADMK+ ला 65-80 जागा मिळतील असे म्हटले आहे.
एक्झिट पोलचे निकाल येत असतानाच, टीव्हीके संस्थापक विजय यांनी महाराष्ट्रातील शिर्डी येथे जाऊन साईबाबांच्या चरणी माथा टेकवला. यावेळी आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यापूर्वी त्यांनी तामिळनाडूतील तिरुचेंदूर येथील मुरुगन मंदिरातही दर्शन घेतले होते. या एक्झिट पोलमुळे तामिळनाडूच्या राजकारणात सध्या कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world