अमरावतीमध्ये पुन्हा एकदा बच्चू कडू विरूद्ध राणा हा वाद पेटला आहे. यावेळी निमित्त आहे ते प्रचारासाठी वापरले जाणारे मैदानाचे. अमरावतीतील सायन्सकोर मैदानावर आरक्षित केल्याचा दावा राणा आणि कडूंकडून होत आहे. या मैदानावर केंद्रीय मंत्री अमित शहा यांची सभा बुधवारी होणार आहे. त्यासाठी संपुर्ण मैदान राणा यांना ताब्यात घेतले आहे. शिवाय मैदानात मंडपही टाकण्यात आला आहे. मात्र बुधवारीच बच्चू कडू यांचीही सभा याच मैदानावर होणार आहे. त्यासाठी हे मैदान आरक्षित केल्याचा दावा कडूंकडून करण्यात आला आहे. त्यामुळे राणा यांनी हे मैदान तात्काळ खाली करावे असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे. तसे न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा इशार त्यांनी दिला.
हेही वाचा - विशाल पाटलांवर कारवाई करणार की नाही? काँग्रेसचा निर्णय ठरला?
बच्चू कडू यांचा इशारा
बच्चू कडू यांनी आपले अमरावती लोकसभेचे उमेदवार दिनेश बुब यांच्यासाठी सभेते आयोजन केले होते. त्यासाठी त्यांनी अमरावतीचे सायन्सकोर मैदान आरक्षित केल्याचा त्यांचा दावा आहे. असे असतानाही मैदानाचा ताबा मात्र रवी राणा यांनी घेतल्याचा कडू यांचा आरोप आहे. शिवाय राणा यांच्याकडे मैदानाची परवानगीही नाही असेही कडू म्हणालेत. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला हे मैदाना खाली करून द्यावे, नाही तर एक लाख शेतकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा कडू यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन मोठ्या अडचणीत सापडले आहे.
अमरावतीत अमित शहा यांची सभा
भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अमरावतीत येत आहेत. त्यांची सभा अमरावतीच्या सायन्सकोर मैदानात ठेवण्यात आली आहे. याच मैदानात बच्चू कडूही सभा घेणार आहेत. त्यामुळे आता हे मैदान नक्की कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासन याबाबत काय निर्णय घेते हे आता पहावे लागेल.
राणा कडू वाद आणखी चिघळणार?
अमरावतीत राणा आणि कडू यांचा वाद सर्वांनाच माहित आहेत. हे दोघेही एकमेकांना पाण्यात पाहात असतात. शिवाय एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधीही सोडत नाहीत. नवनीत राणांच्या उमेदवारीलाही बच्चू कडू यांनी विरोध दर्शवला होता. शिवाय त्यांच्या विरोधात त्यांनी आपल्या प्रहार पक्षाचा उमेदवारीही रिंगणात उतरवला आहे. राणा यांना लोकसभेत निवडून देणे ही चुक होती असेही कडू म्हणाले होते. आता राण आणि कडू मैदानावरून भिडले आहेत.