जाहिरात
This Article is From Apr 23, 2024

विशाल पाटलांवर कारवाई करणार की नाही? काँग्रेसचा निर्णय ठरला?

विशाल पाटलांवर कारवाई करणार की नाही? काँग्रेसचा निर्णय ठरला?
सांगली:

सांगली लोकसभेचा वाद शेवटपर्यंत महा विकास आघाडीच्या नेत्यांना सोडवण्यात यश आले नाही. शेवटी काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवाय त्यांनीही अर्ज कायमही ठेवला आहे. त्यांच्या या कृतीमुळे शिवसेना ठाकरे गट नाराज झाला आहे. त्यांनी विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसकडे केली आहे. कारवाई करून आघाडीचा धर्म काँग्रेसने पाळावा असे शिवसेनेचे मत आहे. त्यामुळे कारवाई करायची की नाही याचा चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात आहे. त्यामुळे काँग्रेस काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा - माघार नाहीच! सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष उमेदवार; चिन्हही ठरलं! 

कारवाई बाबत काँग्रेसची भूमिका काय? 

काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील हे आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार की नाही याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. विशाल पाटील यांनी पक्षशिस्त मोडली आहे.  यांच्यावर कारवाई होईल. पक्षविरोधी कारवाईच्या आधारावर कारवाई करणार आहोत. कोणीतरी त्यांना फूस लावत आहे. 25 तारखेला पक्षाची बैठक होत आहे, त्यावेळी त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पक्ष आता विशाल पाटील यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशाल पाटील काय म्हणाले? 


काँग्रेसपक्ष शेवटपर्यंत आपल्याला एबी फॉर्म देईल अशी अपेक्षा होती. मात्र पक्षाने तसे केले नाही. मात्र आता ही निवडणूक सांगलीकरांची झाली आहे. त्यामुळे सांगलीकरांचा उमेदवार म्हणून आपण निवडणुकीच्या रिंगणात आहोत. असे असले तरी काँग्रेस विचारांचाच उमेदवार सांगलीतून दिल्लीत जाईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींबाबत कोणतेही विरोधी वक्तव्य केले नाही. त्यामुळे कारवाई झाली तरी परतीचे दोर विशाल पाटील यांनी कापलेले नाहीत.  

सांगलीत तिरंगी लढत 

सांगली लोकसभेचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. भाजपचे संजयकाका पाटील, काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांच्यात ही लढत होत आहे. विशाल पाटील यांच्या उमेदवारीमुळे ही लढत आणखी चुरशीची होईल. मागील निवडणुकीत विशाल पाटील यांना पराभव सहन करावा लागला होता. त्याची परतफेड करण्यासाठी विशाल पाटील उत्सुक आहेत. तर संजयकाका पाटील विजयाची हॅट्रीक साधण्याच्या तयारीत आहे. तर दोघांच्या भानगडीत आपला कसा लाभ होईल याकडे चंद्रहार पाटील यांचे लक्ष आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com