मनोज सातवी, पालघर
पालघरमधून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार म्हणून बोईसरचे आमदार राजेश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होता. गुरुवारी उशीरा झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पक्षाध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी उमेदवारीबद्दल अधिकृत घोषणा करण्याआधीच आमदार राजेश पाटील यांनी आज पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत बहुजन विकास आघाडीचे अजीव पाटील, माजी मंत्री मनीषा निमकर, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे राजन पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
बहुजन विकास आघाडीकडून उमेदवारच्या अधिकृत घोषणेबाबत आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत गोपनीयता राखून आमदार हितेंद्र ठाकूर यांची महायुतीला संभाव्य उमेदवाराला शह देण्यासाठी राजकीय खेळी आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
(नक्की वाचा - 'मैत्री जपली त्यासाठी धन्यवाद, पण माझं मतदान तुम्हाला नाही'; गणपत कदम यांनी स्पष्टच केलं)
बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा, पक्षाध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कार्यकर्ता मेळावा घेत पालघर लोकसभा निवडणूक नुसती लढवायची नाही तर जिंकण्यासाठी लढायची असा निर्धार करत प्रचाराचे रणशिंग फुंकले होते. त्यानंतर त्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्या. या मुलाखतीनंतर गुरुवारी झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या बैठकीत बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी निश्चित करण्यात आले होते.
परंतु याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न करताच आज आमदार राजेश पाटील यांनी तातडीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बहुजन विकास आघाडीकडून उमेदवार आणि उमेदवारी अर्ज करताना मोठ्या प्रमाणात गोपनीयता का पाळण्यात आली? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नक्की वाचा - आधी लगीन लोकशाहीचं! मंडपात जाण्यापूर्वी नवरा, नवरदेव मतदान केंद्रावर
हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी हा पक्ष महाविकास आघाडीमध्ये सामील होता. परंतु त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून वेळोवेळी झालेल्या कार्यक्रमांना हजेरी लावली नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना बहुजन विकास आघाडीचा असलेला प्रचंड विरोध.
एनडीटीव्ही मराठीसोबत बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं की, आमच्या पक्षाचे तीन आमदार आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच ग्रामपंचायत, सरपंच यामध्ये आमचे प्राबल्य आहे. त्यामुळे सर्व पक्षांना विनंती आहे की त्यांनी पालघर लोकसभेची जागा बहुजन विकास आघाडीसाठी सोडावी. मात्र शिवसेना-भाजप युतीकडून राजेंद्र गावित यांनाच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे महायुतीचा अधिकृत उमेदवार घोषित होण्याअगोदरच हितेंद्र ठाकूर यांनी आपला उमेदवार घोषित केला आणि त्याचा उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. त्यामुळे दबाव टाकण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांची ही राजकीय खेळी आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.