'शिंदे -पवारांबरोबर विश्वासघात अन् राज ठाकरेंचा गेम' जाधवांचा कोणावर नेम?

जाहिरात
Read Time: 3 mins
रत्नागिरी:

शिवसेना आमदार भास्कर जाधव हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पून्हा एकदा त्यांनी आपल्या रोखठोक भूमिकेमुळे सर्वांचे लक्ष वेधले आहे. एकीकडे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना डिवचले आहे. तर दुसरीकडे त्यांनी भाजपवर निशाणा साधत राज ठाकरेंनाही चिमटा काढला आहे. त्यांच्या या टिकेला मनसेनेही प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे वाकयुद्ध आणखी रंगण्याची शक्यता आहे. 

'शिंदे - पवारांचा विश्वासघात' 
भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विश्वासघात केला आहे असा थेट आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. भाजपने आपले 20 उमेदवार आधी जाहीर केले. त्यानंतर आणखी 3 उमेदवारांची घोषणा केली. मात्र ज्यावेळी शिंदे आणि पवारांच्या उमेदवारांची घोषणा करण्याची वेळ आली, त्यावेळी मात्र भाजपचा सर्वे बाहेर काढला गेला. उमेदवारांबाबत नाराजी कशी आहे हे सांगितले गेले. शिंदेंच्या उमेदवारांचा सर्वे भाजपने केला. तो शिंदेंना करता आला नाही का असा प्रश्नही जाधव यांनी उपस्थित केला. शिंदे-पवारांच्या जागांवर भाजपचा डोळा असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे ज्या भाजपला शिंदे पवारांनी साथ दिली त्यांचाच आता विश्वासघात होत असल्याचे जाधव म्हणाले.   

Advertisement

'राज ठाकरेंचा गेम केला' 
भास्कर जाधव यांनी यावेळी राज ठाकरे यांनाही चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठींबा दिला की द्यायला लावला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शिवाय जसा शिंदे पवारांचा विश्वासघात केला तसा राज ठाकरे यांचा भाजपने गेम केला असेही ते थेट म्हणाले. मनसैनिक हे मुळचे शिवसैनिक आहेत. त्यांच्या नेत्याने काही निर्णय घेतला असेल तो त्यांना घेऊ द्या तुम्ही मात्र उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहा असे आवाहन जाधव यांनी मनसैनिकांना या निमित्ताने केले.

Advertisement

मनसेचा जाधवांवर पलटवार 
जाधव यांनी मनसेला टार्गेट केल्यानंतर मनसेकडूनही प्रतिक्रीया आली आहे. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीट करत ही प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. त्यात ते  'भास्करा आम्हास तुझी दयाही येते अधीमधी, पाहिली आहेस का रे राज टाळी कधी ? आम्हास आता उद्धवाची कीव येऊ लागते, कोत्या मनोवृत्तीची चीड येऊ लागते' अशा प्रकारच्या काव्यात्मक ओळी त्यांनी ट्वीटकरत जाधव यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

'भाजप विरोधात जनतेत राग' 
दरम्यान जनतेच्या मनात भाजप विषयी राग असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी सध्या ऐल्गार पुकारला आहे. त्याला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे.  शरद पवारांना छळण्याचे काम भाजपने केले. त्यामुळे भाजप विरोधात जनतेत रोष आहे. भाजपने काँग्रेस मुक्त भारतची घोषणा दिली होती. मात्र मोदी शहांच्या स्वप्नात तिच काँग्रेस येते असेही जाधव यावेळी म्हणाले. रत्नागिरीत आज ( मंगळवारी ) विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यावेळी जाधव बोलत होते. रामदास कदम यांनी भाजपला दिलेली उपमा योग्यच होती असेही जाधव आवर्जून म्हणाले. 'आम्ही दोघे भाऊ भाऊ तुझं ते वाटून खाऊ, पण माझ्याला हात नको लाऊ' असं रामदास कदम म्हणाले होते.