महाविकास आघाडीत मोठा तणाव, 'पटोले असतील तर चर्चा नाही', ठाकरे गटानं ठणकावलं!

MVA Seat Sharing : काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याबाबत तातडीनं निर्णय घ्यावा आणि जागावाटप पूर्ण करावं, अशी ठाकरे गटाची मागणी आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. राज्यातील सर्व 288 जागांवर 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत 29 ऑक्टोबरपर्यंत आहे. पण, त्यानंततरही महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. विदर्भातील काही जागांवर घटक पक्षांमधील संबंध ताणले गेले आहेत. 

नाना पटोले आणि ठाकरे गटातील तणाव चांगलाच वाढला आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीला नाना पटोलो असतील तर त्या बैठकीला जाणार नसल्याचं ठाकरे गटानं कळवलं आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

विदर्भातील या जागांसाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे. महाविकास आघाडीच्या गुरुवारी (17 ऑक्टोबर 2024) झालेल्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात खटके उडाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. .नाना पटोले विदर्भातील तिढा असलेल्या जागांवर अडून असल्याची तक्रार ठाकरेंच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केली आहे, असं सूत्रांनी सांगितलं. 

विधानसभा निवडणुकीला काही दिवस शिल्लक आहेत. या जागांवर लवकरात लवकर निर्णय व्हावा असा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे. त्यावेळी नाना पटोले यांची  भूमिका जागावाटप पूर्ण करण्यात अडचण निर्माण करत आहे, असा ठाकरे गटाच्या नेत्यांचा दावा आहे. त्यांनी याबाबतची तक्रार काँग्रेस हायकमांडकडं केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याबाबत तातडीनं निर्णय घ्यावा आणि जागावाटप पूर्ण करावं, अशी ठाकरे गटाची मागणी आहे. 

( नक्की वाचा : 'महाराष्ट्राचा हरियाणा होऊ द्यायचा नाही', काँग्रेस हायकमांडची राज्यातील नेत्यांना 3 विषयांवर वॉर्निंग )

महाविकास आघाडीमध्ये कोणत्या जागांवर मतभेद?

महाविकास आघाडीमधील जागा वाटपात 15 जागांवर मतभेद आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीत मतभेद असलेल्या जागांची नावं समोर आली आहेत. त्या जागा खालीलप्रमाणे

दक्षिण नागपूर
 श्रीगोंदा
 पारोळा
 हिंगोली
 मिरज
शिर्डी 
रामटेक 
सिंदखेड राजा 
 दर्यापूर 
 गेवराई
 उदगीर
 तुमसर  
कुलाबा 
भायखळा 
वर्सोवा


राऊतांचा हल्लाबोल

दरम्यान, जागावाटपात होत असलेल्या दिरंगाईवरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते निर्णय घेण्यास सक्षम नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली. पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी म्हटलं की, महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये राज्यातील विधानसभेच्या 288 पैकी 200 जागांवर सहमती झाली आहे. जागावाटपाबाबत काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपाल आणि मुकुल वासनिक तसेच महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासोबत शुक्रवारी बातचित झाली आहे. हे सर्व नेते राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.