- भाजपाला तळकोकणातील मालवण आणि कणकवली नगरपालिकांमध्ये मोठा पराभव सहन करावा लागला आहे
- भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी खासदार नारायण राणेंना प्रचार न केल्याबद्दल जबाबदार धरले आहे
- चव्हाण यांनी मालवण आणि कणकवलीतील पराभवावर चिंतन करण्याचा आणि चुका सुधारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे
नगरपालिका निडणुकीत भाजप हा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. पण असं असलं तरी पक्षाला एक पराभव मात्र जिव्हारी लागला आहे. तो पराभव झाला आहे तळ कोकणात. तळ कोकणातल्या मालवण आणि कणकवली या मोठ्या आणि तेवढ्याच प्रतिष्ठीत नगरपालिकांमध्ये भाजपचा दारूण पराभव झाला. या पराभवानंतर भाजपमधला अंतर्गत वाद उफाळून आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी थेट नारायण राणेंना याचे जबाबदार धरले आहे. शिवाय त्यांच्यावर टीका ही केली आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर तळकोकणातलं राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
कणकवली आणि मालवणमध्ये झालेल्या पराभवानंतर चव्हाण यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. मालवणच्या निवडणुकीत आपण एकदाच प्रचाराला गेलो होता. आम्ही सावंतवाडी आणि वेंगुर्ला या नगरपरिषद जिंकलो आहोत. पण मालवण आणि कणकवलीमध्ये आमचा पराभव झाला आहे. हे मान्य करावे लागेल. मालवण येथे अपयश आले. या निवडणुकीत खासदार नारायण राणे भाजपाच्या प्रचाराला आले नाहीत. त्याचा फटका पक्षाला बसला. नारायण राणे यांनी प्रचार करायला हवा होता. निलेश राणे ही नारायण राणे हे आपल्या सोबत असल्याचं सांगत होते. त्याचा फटका आम्हाल नक्कीच बसला असं ही ते म्हणाले.
नारायण राणे हे भाजपचे खासदार आणि नेते आहे. त्यामुळे त्यांनी भाजप म्हणून प्रचारात पुढाकार घ्यायला हवा होता. पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे रविंद्र चव्हाण यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. कोकणात आम्ही अनेक नगरपरिषदा पहिल्यांदा जिंकल्या आहेत असं ही त्यांनी या निमित्ताने सांगितलं. पण चर्चा मात्र मालवणचीच होत आहे. विजयापेक्षा पराभवची अधिक चर्चा होते असंही ते म्हणाले. ज्या ठिकाणी पराभव झाला आहे त्या ठिकाणी आम्ही चिंतन नक्कीच करू. पराभवाची कारणं शोधू. पुन्हा असं होणार नाही याची काळजी घेवू असं ही त्यांनी यावेळी सांगितलं. पण त्यांनी राणेंवरची नाराजी जाहीर पणे व्यक्त केली.
दरम्यान राज्यात भाजपाला मिळालेले यश हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे आहे असं ते म्हणाले. सध्या मिळालेल्या यशापेक्षा अधिक जागा मिळायला हव्या होत्या असं ही ते म्हणाले. जवळपास 135 पर्यंत आम्ही नगराध्यक्ष पदाच्या जागा जिंकायला हव्या होत्या. काही ठिकाणी चुकीचे उमेदवार दिले. यामुळे काही जागा पराभूत झाल्या. अडचणी आल्या पण पुढील काळात या चुका सुधारल्या जातील असं ही ते म्हणाले. एकनाथ शिंदेंना जे यश मिळालं ते महायुतीच्या सर्वच नेत्यांनी प्रचारामध्ये तारतम्य बाळगले असा टोला ही त्यांनी या निमित्ताने लगावला. दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांच्याशी मी स्वतः बोललो आहे. त्यांची नाराची दूर करण्याच्या संदर्भात आम्ही एकत्रित बैठक घेणार आहोत असं ही त्यांनी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world